सामाजिक भान बाळगून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना शिक्षण आणि पर्यावरण या अत्यावश्यक गोष्टींचे महत्त्व पटवून देण्यासाठी कल्याणमधील काही तरुणांनी शलाका युवा गटाची स्थापना केली आहे.

शलाका युवा गट-कल्याण

शहापूर तालुक्यातील खराडे गावात महिलांनी तयार केलेल्या मऊ सूत गोधडय़ांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यामध्ये या महिलांच्या कौशल्याइतकेच कल्याणमधील शलाका युवा गटाच्या विक्री आणि वितरण तंत्राचेही तितकेच महत्त्वपूर्ण योगदान आहे. खराडे गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऊर्जा प्रकल्पांतर्गत भरवलेल्या गोधडी प्रदर्शनाला ग्राहकांनीही उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे या प्रदर्शनात केवळ काही तासांमध्ये जवळपास १०० गोधडय़ांची विक्री झाल्याने येथील महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लागला. त्यामुळे या गोधडय़ा आता परदेशातही पोहोचल्याने या महिलांना एक वेगळा आत्मविश्वास मिळाला आहे.

शलाका गटामार्फत डोंबिवलीतील टिळकनगर विद्या मंदिर येथे महिलांनी साकारलेल्या विविधरंगी, विविधढंगी गोधडय़ांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. माझगाव डॉक आणि कर्वे समाजसेवा संस्था, पुणे यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याासठी स्नेहल नाईक आणि शलाका या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला होता. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने गोधडी तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. या महिला पूर्वी घरी हाताने गोधडय़ा बनवत असत. पण, त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा आणि गोधडय़ा अधिक आकर्षक दिसाव्यात, यासाठी त्या महिलांना जळगाव येथे पाठवून प्रशिक्षण देण्यात आले. महिलांना रोजगार मिळावा आणि गोधडी शिवण्याची लुप्त होत असलेली कला टिकून तिला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

गोधडय़ा शिवण्याची परंपरागत कला त्यांना अवगत होतीच, पण प्रशिक्षणाने त्यात व्यावसायिक सफाईदारपणा आला. शहरात भरविण्यात आलेल्या गोधडय़ांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातून त्यांना आत्मविश्वासही मिळाला. त्यातून त्यांनी विक्रीकौशल्यही आत्मसात केले.

पुस्तके लुटण्याचा कार्यक्रम

दसऱ्याला लुटणाऱ्या सोन्याऐवजी सोन्यासारखी पुस्तके लुटा हा आगळावेगळा उपक्रम शलाका युवा गट लोकांसमोर घेऊन येतात. त्यामध्ये आपल्याकडील जुनी किंवा नवीन सुस्थितील पुस्तके गरीब होतकरू मुलांना मिळावी, या उद्देशाने यासाठी या युवा गटाने लोकांना पुस्तके देण्याचे आवाहन होते. काही तरुणांनी आपल्याकडील वापरलेल्या गोष्टींची तसेच अभ्यासांची उपयुक्त पुस्तके या उपक्रमाला दिली. तसेच काहींनी नव्या पुस्तकांचा संचही दिला. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून शलाका युवा गटातर्फे बेलपाडा येथील एका गावातील शाळेमध्ये लहान मुलांसाठी एक ग्रंथालय सुरू करण्यात आले. या ग्रंथालयामुळे येथील आसपासच्या गावांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.

स्वच्छतेची गुढी..

नववर्ष स्वागतयात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेत सेल्फी काढण्यात रममाण होण्यापेक्षा समाजातील वाईट चालीरीतींना आळा घालण्यासाठी काहीतरी केले पाहिजे या विचारातून हा गट डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेमध्ये कचरा वेचण्याचे सत्कार्य करतो. स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्यांसाठी जागोजागी पाणी, सरबत तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारण्यात येतात. या वेळी यात्रेकरू पाण्याचे ग्लास, खाद्यपदार्थाची पाकिटे रस्त्यावर टाकून पुढे मार्गक्रमण करतात. अशा वेळी स्वगातयात्रेच्या शेवटी उभे राहून हातामध्ये कचऱ्याच्या पिशव्या घेऊन रस्त्यावरचा संपूर्ण कचरा गोळा करण्याचे काम हा गट अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गेली तीन वर्षे करत आहे.