ठाणे : काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. होळीच्या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळी नैवेद्य म्हणून बनवली जाते. परंतू, दुसरीकडे ज्यांचे घर तुटपुंज्या पगारावर चालते अशा कष्टकऱ्या कुटूंबांना याचे सुख मिळत नाही. यासाठी अशा कुटूंबांपर्यंत होळीचा खरा आनंद पोहोचविण्याचे काम ठाण्यातील काही तरुणमंडळी अविरत थोडं सोशल च्या माध्यमातून करत आहे. या तरुणांनी एकत्रित येत ‘एक पुरणपोळी जाणिवेची’ असा उपक्रम सुरु केला असून यामध्ये घराघरांमधून पुरणपोळी संकलित करुन त्याचे वाटप कष्टकरी कुटूंबांना करतात.

आपले सण साजरा करायचा खरा आनंद हा सामुदायिक सौख्यात आहे, असा विचार या तरुणांचा असून हे उद्दिष्ट समोर ठेवून एक पुरणपोळी जाणिवेची हा उपक्रम सुरु केला असल्याची माहिती अविरत थोडं सोशल या समुहातील मोहित जोशी या तरुणाने दिली. गेले अनेक वर्षे हा उपक्रम राबविला जात असून नागरिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संघ विचाराने प्रेरित होऊन प्रताप व्यायाम शाळा सेवा संस्था आणि अविरत थोडं सोशल यांच्या वतीने ‘एक पुरणपोळी जाणिवेची २०२५’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. होळीच्या दिवशी म्हणजे १३ मार्च रोजी संध्याकाळी ४ ते ८ यावेळेत पुरणपोळ्या संकलित केल्या जाणार आहेत. संकलित झालेल्या पुरणपोळ्या समाजातील कष्टकरी नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा सण या उपक्रमातून गोड केला जाणार आहे. अविरत थोड सोशलचे सिद्धांत पाटणे, मोहित जोशी ,हर्ष शिंदे, संकेत दिवाण या उपक्रमात पुरणपोळ्यांचे संकलन करणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अविरत थोडं सोशलच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमात सहभागी कसे व्हाल ?

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गुरुवार, १३ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ८ यावेळेत जाणिवेची एक पुरणपोळी प्रताप व्यायामशाळा, कै. वामनराव ओक रक्तपेढी मागे, सहयोग मंदिर पथ, नौपाडा, ठाणे (प.) येथे जमा करता येणार आहे. याठिकाणी केवळ पुरणपोळी स्विकारली जाईल. अन्य कोणतेही अन्नपदार्थ आणि आर्थिक मदत स्विकारली जाणार नाहिये. तसेच एका घरातून एकच पुरणपोळी अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी ९३७२९६६५१० या क्रमांकावर संपर्क साधावा.