25 January 2021

News Flash

कोटीच्या कोटी उड्डाणे

चित्रा रामकृष्ण. फोर्ब्स यादीतील एक निर्विवाद नाव.

चित्रा रामकृष्ण. फोर्ब्स यादीतील एक निर्विवाद नाव. आर्थिक उलाढालीच्या बाबतीत देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराच्या, १.६५ लाख कोटी डॉलरहून अधिकचे बाजारमूल्य असलेल्या ‘एनएसई’च्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ असणाऱ्या चित्रा या आशिया पॅसिफिकमधील शेअर बाजाराच्या चीन आणि श्रीलंका नंतरच्या तिसऱ्या महिला सीईओ ठरल्या आहेत. त्यांच्या केबिनमधल्या कार्यकर्तृत्वाचा हा लेखाजोखा.

‘एनएसईच्या उभारणीत मी होतेच. त्याबाबतची धोरणे, बैठका असं सर्व काही सुरळीत सुरू होतं. आणि अचानक एकदा एका संचालक मंडळाच्या बैठकीनंतर माझे तत्कालीन मार्गदर्शक रवी नरेन यांचा मला फोन आला. मला म्हणाले, ‘तयार राहा. खूप मोठी जबाबदारी तुझ्यावर येणार आहे.’ वाटलं. काही तरी महत्त्वाचं घडायचं असेल आपल्या हातून. पण.. थेट सीईओपदच हाती आलं. हो, हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता आणि तो माझ्या आयुष्यातील केवळ ‘टर्निग पॉइंट’च नव्हता तर ती एक सवरेत्कृष्ट घटना ठरली. अर्थात या साऱ्यांकडे मी कर्तव्याचा भाग म्हणूनच पाहते. ‘एनएसई’त येण्यापूर्वीही मी संबंधित चौकटीचा अविभाज्य घटक म्हणूनच कार्यरत होते.. मात्र आता एका महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आली होती. हे काहीसं संवेदनशील क्षेत्र आहे, पण म्हणून तणावपूर्ण, आकडय़ांसारखा निस्तेज दिवस मी कधीच घालवत नाही..’ हे सांगत होत्या चित्रा रामकृष्ण. हर्षद मेहता घोटाळा आणि त्याचवेळी विदेशी गुंतवणूकदारांची गर्दी अशा वातावरणातला तो नव्वदीचा काळ, त्याच काळात बाजार मंचाला आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

चित्रा यांची सुरुवातीची काही वर्षे चेन्नईत गेली असली तरी त्यांचं सर्व शिक्षण मुंबईतच झालं. पोद्दार कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतली आणि मग सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंट) होणं त्यांच्यासाठी अपरिहार्य होतं, कारण त्यांना वाणिज्य क्षेत्रातच करिअर करायचं होतं. चित्रा यांचे वडीलही सीए होते. आजोबाही जवळपास याच व्यवसायाशी संबंधित. त्यामुळे त्यांनी या क्षेत्राकडे वळणं जणू ठरूनच गेलं होतं.

१९८५ मध्ये त्या ‘आयडीबीआय’च्या वित्तविषयक एका प्रकल्पात सहभागी झाल्या. काही दिवस ‘सेबी’मध्ये काम केल्यावर त्या पुन्हा ‘आयडीबीआय’मध्ये परतल्या. यावेळी त्यांच्याकडे आर्थिक विषयातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी देण्यात आली. रोखे पद्धतीच्या गुंतवणूक प्रकारातील योजना तयार करण्यात त्या योगदान देऊ लागल्या. चित्रा यांच्या रोखेयोजने दरम्यानची कार्यपद्धती ‘आयडीबीआय’चे कार्यकारी संचालक आर.एच. पाटील यांनी हेरली आणि त्यांनी ‘एनएसई’च्या उभारणीकरिता चित्रा यांची शिफारस केली. ‘आयडीबीआय’चे तेव्हाचे अध्यक्ष एस. एस. नाडकर्णी यांनीही ‘एनएसई’च्या तयारीकरिता निवडलेल्या पाच व्यक्तींमध्ये (रवी नरेन यांच्यासह) चित्रा याही होत्या. एरव्ही सरकारी आस्थापनेत दिसणारा ‘कम्युनिकेशन्स’चा अभाव चित्रा यांच्या कार्यपद्धतीत किंचितसाही दिसत नाही व हीच त्यांची ‘एनएसई’त येण्यासाठीची गुणपारख ठरली. शिवाय राष्ट्रीय शेअर बाजारापूर्वी अस्तित्वात आलेल्या बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘सेबी’करिता त्यांनी अनेक नियमावली तयार केल्या आहेत ते योगदानही महत्वाचं ठरलं.

चित्रा यांच्या नेतृत्वाखाली आज ‘एनएसई’चा विस्तार होत असून जगभरातील १५ हून अधिक शेअर बाजारात निफ्टी निर्देशांकाला स्थान देण्यात आले आहे. ‘सीएनएक्स निफ्टी ५०’ ही आता एक जागतिक नाममुद्रा झाली आहे. नियामकाने तयारी दाखविल्याने खुद्द बाजारांच्या सूचिबद्धतेच्या भाऊगर्दीत ‘एनएसई’देखील सहभागी होईलच. ‘एनएसई’ हा अर्थसज्ज भारतीयांचं माध्यम ठरावं, हेच त्यांचं ध्येय आहे. त्यासाठी बाजारात पूरक उत्पादने आणि व्यवहार सुलभता आणण्याचा त्यांचा मानस आहे.

बाजारात व्यवहार करण्यासाठी लागणारी स्वतंत्र यंत्रणा, अर्थात डिपॉझिटरीसाठी देशव्यापी व्ही-सॅटचे जाळे उभारणे चित्रा यांच्या पुढाकाराने शक्य झाले आहे. यामुळे बाजारातील समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार गतीने व जलद तंत्रज्ञानाद्वारे सर्वदूर होण्यात सुलभता आली आहे. देशातील दुर्गम भागातही केवळ दूरध्वनीवर नव्हे तर प्रत्यक्ष संगणक अथवा मोबाइलवर बाजारातील व्यवहार करता येणं सोयीचं झालं आहे.

‘एनएसई’च्या उभारणीपासून प्रत्यक्ष त्यात महत्त्वाच्या पदावर कार्य करण्याची संधी या प्रवासाचे वर्णन करताना त्या म्हणतात, ‘एनएसईच्या सक्रिय उभारणीनंतर केवळ हा बाजारच वाढला नाही तर मलाही अनुभवानं खूप विस्तारता आलं. प्रत्यक्ष एखाद्या प्रकल्पात काम करणं आणि मोठय़ा जबाबदारीचं कार्य आपल्या हातून घडणं या साऱ्यात सचोटी, परिश्रम खूप उपयोगी आले. शेअर बाजारासारख्या ठिकाणी तर त्याचबरोबर संयम आणि संवेदनशीलताही जोपासावी लागतेच.’
वेळ आणि कामाच्या बाबतीत चित्रा या एकदम वक्तशीर आणि तेवढय़ाच उत्साहीदेखील. गुंतवणूकदार, भागधारक यांना अनेकदा धडकी भरविणाऱ्या तर कधी त्यांना परमोच्च आनंद देणाऱ्या समभाग मूल्य, निर्देशांक यांच्याशी सतत संबंध येणाऱ्या चित्रा स्वत: प्रचंड संयमी आहेत. तसेच कर्नाटकी संगीताची प्रचंड आवड असणाऱ्या चित्रा कधी कधी आपली वीणावादनाची हौसही भागवून घेतात. चेन्नईत वर्षांतून एकदा होणारी चक्कर त्यांना हा छंद जोपासायला सहाय्यभूत ठरते. नियामकाची बंधनं आणि मर्यादा प्रसंगी कौटुंबिक, सामाजिक सहभागाला मुरड घालते, हे त्या लपवू शकत नाहीत; मात्र कामाप्रतिचा आनंद व्यक्त करतात.

चित्रा यांचा बाजार मंचातील दोन दशकांचा अनुभवच ‘एनएसई’लाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सातवा मोठा भांडवली बाजार म्हणून गणला जाण्यास कारणीभूत ठरला आहे. आजमितीला बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य एक लाख कोटी डॉलरच्याही वर गेले आहे. १३० वर्षांहूनही जुन्या ‘बीएसई’च्या तुलनेत ‘एनएसई’चा नफाच सहा पट अधिक. तेव्हा स्पर्धेबाबत ‘ती तर हवीच’, यावर त्या ठाम. स्पर्धेमुळे व्यवसायात पोषक वातावरण निर्मिती होते; अधिक पारदर्शकता येते, असं त्यांना वाटतं.

‘व्यवसाय म्हणून जबाबदारी निश्चितच मोठी असते.’ एनएसईच्या प्रमुखपदाची भूमिका विशद करताना चित्रा सांगतात, ‘हा मंच (राष्ट्रीय शेअर बाजार) म्हणजे नियम, नियंत्रण यांचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून लाखो लोक जोडले जात असल्यामुळे आणि अतिशय संवेदनशील क्रिया येथे होत असल्याने प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक निर्णय अगदी नियामकाच्या कक्षेतच घेतला जातो. बाजारासाठी काय करायचे आणि काय नाही, हे सरकार म्हणून नियामक निर्णय घेते आणि आम्हाला त्याची अंमलबजावणी करणं अत्यावश्यक ठरतं. आमची स्वत:ची संहिताही आहे. कामाप्रतिची सचोटी आणि कार्यक्षमता या बाबी मग वैयक्तिक पातळीवरही अनिवार्यच ठरतात.’

कामाच्या ठिकाणी भागधारक, गुंतवणूकदार हेही खूप महत्त्वाचे असतात, यावर विश्वास असलेल्या चित्रा आपले सहकारी, कर्मचारी यांच्या सूचनांनाही तेवढंच प्राधान्य देताना आढळतात. कोणताही व्यवसाय हा भक्कम मूल्यांवरच उभारला पाहिजे, म्हणूनच विश्वास आणि नैतिकता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं त्या मानतात. त्याचबरोबरीने व्यवसायाची अंतर्गत ठोस नियोजनबद्ध रचनाही तेवढीच आवश्यक आहे, हेही त्या सांगतात. त्यांच्या मते, हे सारं तुम्हाला निश्चितच शून्यातून एका मोठय़ा विधायक गोष्टीकडे घेऊन जाणारं ठरतं.

आयुष्याचा मूलमंत्र
‘प्रत्येक जण सर्व काही करू शकतो. संधीचे सोने करता आले पाहिजे. त्यासाठी मन आणि शरीरावर अतिरिक्त भार पेलायची गरजच नाही’

करिअरचा मूलमंत्र
एक बॉस म्हणून तुम्हाला सतत रिझल्ट द्यावे लागतात. सहकाऱ्यांकडून जेव्हा तुम्ही अपेक्षा करता तेव्हा तुमचीही ती जबाबदारी असतेच. कामाच्या ठिकाणचे सहयोगी म्हणा अथवा कर्मचारी यांच्याबद्दल, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आत्मीयता बाळगायलाच हवी. तुम्ही जेवढे मोकळे व्हाल तसाच प्रतिसाद तुम्हाला समोरून येईल. यामुळे कामातील दडपण जाणवणार नाही. मात्र जबाबदारीची जाणीव सर्वानाच होईल.

एनएसई
एनएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजार हा देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार आहे. भारतातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराप्रमाणे (बीएसई) येथेही कंपन्यांच्या समभाग खरेदी – विक्रीचे व्यवहार होतात. देशात उदारीकरणाचे वारे सुरू झाल्यानंतर मार्गस्थ झालेला हा मंच बीएसईच्या तुलनेत तसा खूपच तरुण. पण देशभरातील तीन लाखांहून अधिक ठिकाणांहून दोन कोटी गुंतवणूकदारांमार्फत होणाऱ्या व्यवहाराने १.६५ लाख कोटी डॉलरहून अधिकचे बाजारमूल्य (मार्केट कॅपिटल) एनएसईला अल्पावधीत कमावते आले आहे. चित्रा रामकृष्ण एप्रिल २०१३ पासून एनएसईच्या सीईओपदी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:10 am

Web Title: interview of chitra ramkrishna
टॅग Chaturang
Next Stories
1 ‘पदाचा आदर महत्वाचा’
Just Now!
X