माणसानं आजवर अनंत प्रकारचं साहस केलं. कधी तो एव्हरेस्टच्या माथ्याला स्पर्श करून आला, तर कधी त्यानं अंतराळाची सैर केली. त्याच्या या साहसाच्या इच्छा-आकांक्षांपुढे आभाळही खऱ्या अर्थानं ठेंगणं झालं आहे, पण जमीन आणि अवकाशाच्या मानानं त्यानं पाण्याचं आव्हान मात्र फार कमी वेळा स्वीकारलं. त्यामुळेच आजवर हजारो लोकांनी एव्हरेस्ट सर केलं आणि शेकडो लोक अंतराळात जाऊन आले तरी उघडय़ा शिडाच्या नौकेतून सागरी परिक्रमेचा थरार मात्र फार कमी जणांनी अनुभवला.
समुद्र हे माध्यमच बेभरवशाचं आहे. कधी त्याची चित्तवृत्ती शांत आणि स्थिर असते, तर कधी तो रोंरावत बोटीला गिळंकृत करण्याच्या आवेशानं तुटून पडतो. दर्यावर्दीना त्याच्या या बदलत्या ‘लहरीं’चाच सामना पावलोपावली करावा लागतो. आजूबाजूला अथांग जलाशयाचं साम्राज्य आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वत:च्या जवळ संरक्षणापुरती केवळ लहानशी बोट! अशा वेळी येणारा प्रत्येक क्षण दर्यावर्दीच्या मनोधैर्याची आणि कणखरपणाची कसोटी बघणारा असतो. अशात एकटय़ानं सागर परिक्रमा करणं हे तर आणखी अचाट साहसाचं काम असतं. पण या साहसालाही आता आम्ही भारतीयांनी गवसणी घातली आहे.
जगामध्ये असं साहस करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये आता दोघा भारतीयांचाही समावेश झालाय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कमांडर दिलीप दोंदे आणि लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी भारतीय बनावटीच्या ‘म्हादेई’ नावाच्या शिडाच्या होडीतून एकटय़ानं २३,००० सागरी मैलांचा (जवळजवळ ४०,००० कि.मी.) प्रवास केला आणि आपली पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. या दोघांची नावं आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या परिचयाची असतील.
कमांडर दोंदे यांनी २००९-१० मध्ये ही प्रदक्षिणा पूर्ण करताना जगातला १७५वा दर्यावर्दी होण्याचा मान मिळवला. तर अभिलाष टॉमीनं २०१२-१३ मध्ये त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणखी एक पाऊल पुढे टाकलं. त्यानं ही परिक्रमा कुठेही न थांबता सलग पूर्ण केली आणि अशा प्रकारचा पराक्रम करणारा जगातला तो ८०वा दर्यावर्दी ठरला. १९६९ साली एका ब्रिटिश दर्यावर्दीनं सर्वप्रथम हा पराक्रम केला होता.
पृथ्वीप्रदक्षिणेच्या काळात सागराचं आव्हान तर असतंच, शिवाय प्रवासाच मार्ग या साहसाला अधिक खडतर बनवतो. या प्रवासात दर्यावर्दीना पृथ्वीची केप ल्युईवीन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप ही तीनही मोठी भूशिरं दक्षिणेकडे जाऊन ओलांडावी लागतात. शिवाय, पृथ्वीवरचं प्रत्येक वृत्त पार करावं लागतं. विषुववृत्त तर दोन वेळा ओलांडावं लागतं.
‘असं जिवावरचं साहस का करायचं?’ याला खरंतर ‘साहसाला मोल नाही’ असंच उत्तर आहे. पण मी म्हणेन, की अशा प्रकारचं साहस माणसाचं व्यक्तिमत्त्व, चारित्र्य घडवतात. इतर कुठल्याही खेळातून जे साध्य होत नाही, ते अशा प्रकारच्या साहसातून साध्य होतं. आपला देश क्रिकेटवेडा आहे. तो चांगला खेळ आहे, यात वादच नाही. पण क्रिकेट खेळण्यातून एक संपन्न व्यक्तिमत्त्व आकाराला येऊ शकत नाही आणि भविष्यकाळात आपल्याला देशाचं नेतृत्व करण्यासाठी चारित्र्यसंपन्न तरुण हवे आहेत. शिडाच्या नौका हाकारून खोल समुद्रात खुल्या मनानं त्याचं आव्हान स्वीकारल्याशिवाय तुम्हाला माझ्या ‘चारित्र्यसंपन्न’ या शब्दाचा अर्थ कळणार नाही. कारण हे चारित्र्यच तुम्हाला जिवावरच्या संकटावर मात करण्याचं बळ देतं आणि समुद्र तर कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय तुम्हाला अशा संकटात लोटण्यासाठी नेहमी तयारच असतो.
आपल्या देशाच्या नेत्यांमध्ये नेमका चारित्र्यसंपन्नतेसाठी लागणाऱ्या गुणांचा अभाव आहे. त्यामुळे असे नेतेच देशाच्या अधोगतीला कारणीभूत आहेत, हे सांगायला कुणा संशोधकाची गरज नाही.
खरंतर, समुद्राचं महत्त्व सगळय़ा जगासाठी अनन्यसाधारण आहे. तो जागतिक व्यापाराचा महामार्ग आहे. या मार्गानंच तर जगातील सर्व देश एकमेकांशी जोडले आहेत. म्हणूनच ज्या देशांना समुद्रकिनारा नाही, त्यांनाही व्यापारासाठी समुद्रकिनारा असलेल्या देशांशी संधान बांधावं लागतं. आपल्या देशाला तर पूर्वेला आणि पश्चिमेला विस्तीर्ण सागरकिनारपट्टी आहे. या समुद्रानंच आपल्या देशाला सुंदर भौगोलिक रचना बहाल केली आहे. पण आपल्या राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेत या सागराला मात्र काहीच स्थान नाही. म्हणूनच आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीत चीननं जशी प्रगती केली, तशी आपण करू शकलेलो नाही.
ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण अधिकाधिक सागराभिमुख व्हायला हवं. तरुणांना सागराकडे वळवायला हवं. त्यांची समुद्राशी मैत्री होण्यासाठी साहसी सागरी खेळांना प्रोत्साहन द्यायला हवं. आपल्या राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेत या सागराचा समावेश व्हायचा असेल तर लहानथोर सर्वच जण समुद्राच्या सान्निध्यात कसे अधिकाधिक रमतील त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सुटीच्या काळात, विरंगुळय़ासाठी हे सर्वच जण समुद्राच्या सहवासात आले तर हा जलनिधी त्यांचा सखा बनायला वेळ लागणार नाही.
सागर परिक्रमा करणाऱ्या या दोन वीरांनी समुद्राचा राष्ट्रबांधणीसाठी कसा उपयोग करता येतो, याचा मार्गच दाखवला आहे. तरुणांनी त्यांचा आदर्श ठेवायला हवा. नौदल हे भारतीय सागरी क्षेत्राच्या सर्वोच्च स्थानी असते. त्यामुळे मी नौदलाकडे विनंती करेन, की त्यांनी तरुणांना समुद्राकडे आकर्षित करण्यासाठी किनाऱ्यावर वेगवेगळय़ा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, कारण त्यांचा खर्च फक्त नौदलालाच परवडू शकतो.
या दोन सागरी परिक्रमांमुळे समुद्र सामान्य जनतेपर्यंत पोहोचला. त्याच्या भावविश्वातही त्याला स्थान मिळाले. या मोहिमेतून आता आपल्याकडे अन्य साहसाप्रमाणेच समुद्री साहसाचे वेडही वाढावे आणि त्यातून त्याच्याशी मैत्री व्हावी ही अपेक्षा!