धरणासारख्या मोठय़ा प्रकल्पात अनेक गावेच्या गावे बुडतात, विस्थापित होतात. या जलसंपादनात अनेकदा काही प्रेक्षणीय स्थळांनाही जलसमाधी मिळते. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूरजवळ साकारलेल्या उजनी जलाशयाचा असाच एक तडाखा पळसदेवमधील पळसनाथ आणि काशी विश्वनाथ या प्राचीन मंदिरांना बसला. यातील पळसनाथाचे मंदिर तर पूर्णपणे पाण्यात बुडाले तर काशी विश्वनाथाचे उपेक्षेच्या खाईत. भटकंतीचे वेड असणाऱ्यांनी मुद्दाम वाट वाकडी करून पाहावीत अशी ही दोन मंदिरे आहेत. दरवर्षी उन्हाळा तापू लागला, दुष्काळ पाण्याचा तळ गाठू लागला, की ही दोन्ही मंदिरे व्यवस्थित पाहता येतात.
पुणे-सोलापूर महामार्गावर ११० किलोमीटरवर पळसदेव. इंदापूर, सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व एस.टी बस इथे थांबतात. या गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर उजनी जलाशय आहे. या जलाशयातच १९७५ साली मूळ पळसदेव गाव बुडाले. गावचा हा बुडालेला भाग उंचावरचा असल्याने तो पूर्ण न बुडता त्याला एखाद्या बेटासारखा आकार प्राप्त झाला आहे. या जुन्या गावी आलो, की एकेकाळी तालेवार असलेल्या या पळसदेवचे वैभव जागोजागी दिसू लागते.
प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता. या तटाला चार वेशी होत्या. भट, नाथ, चांभार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण १९७५ साली इथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात घेतले.
आज इथे फिरू लागलो, की धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी विश्वनाथाची कोरीव मंदिरे आल्या-आल्या लक्ष वेधून घेतात. यातील काशी विश्वनाथ पाण्याच्या काठावर. धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेले. त्याचा कोरीव प्राकार दुरूनच लक्षात येतो. जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता जणू आपल्या मनाचा ताबाच घेते.
मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे कोसळलेले. द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती घडय़ांच्या आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार शिल्पे. सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण करणारा.
भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत. अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे. यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील ती सीता, हाती शिळा घेऊन सेतू बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम-रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात.
हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे. मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही. स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे. यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात, ..पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, पण इथे कुठल्या देवतेची स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच राहिले. पुराणातील भांडणावरून या मंदिरास पुढे ‘भांडपुराण’ असेही नाव पडले.
खरेतर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन काळी हे महादेवाचेच मंदिर असावे आणि मध्ययुगात कधीतरी यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इथली देवता अन्यत्र हलविली असण्याची शक्यता वाटते. मंदिराच्या रचनेवरून ते हजारएक वर्षे प्राचीन नक्कीच असावे, यासाठी परिसरातीलच बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. असो. आज या साऱ्या मंदिराभोवती उजनीचा वेढा पडल्याने हे मंदिर उपेक्षेच्या फे ऱ्यात अडकले आहे. पाण्याच्या प्रत्येक लाटेबरोबर इथल्या या कोरीव शिळा ढासळत आहेत. जनतेचे दुर्लक्ष त्याला आणखी हातभार लावत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास हे सारे मंदिरच एके दिवशी पाण्यात लुप्त होईल.
पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव-कलात्मक! मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्याचे उंच गेलेले सप्तभूमिज पद्धतीचे शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते. कधी १९७५ साली पाण्यात बुडालेले हे मंदिर २००१ मधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडले होते. या वेळी पुरातत्त्व अभ्यासक, इतिहास संशोधक, पर्यटक, यात्रेकरू यांनी मोठय़ा संख्येने या मंदिरास भेट दिली होती. या वेळी हे मंदिर वाचविण्याविषयी, त्याच्या पुनरुज्जीवनाविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. पण ही फक्त चर्चाच राहिली आणि पुढच्याच पावसाळ्यात हे मंदिर पुन्हा उजनीत लुप्त झाले. खरेतर शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील साखर कारखाने, ग्रामस्थ यांनी मनावर घेतले तर पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली पळसनाथ व काशी विश्वनाथ या दोन्ही मंदिरांचे शेजारी मूळ गावाच्या जागीच पुनर्वसन करणे सहज शक्य आहे. कर्नाटकातील नागार्जुन कोंडा इथे धरण साकारण्यापूर्वी तिथल्या प्राचीन मंदिरांचे पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अशाच पद्धतीने अन्यत्र पुनर्वसन केल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे.
पण हा असला विचार देखील आपल्याकडे होत नाही. ही मंदिरे वाचविण्यापेक्षा आम्ही गावोगावी सध्या बेढब-रंगीबेरंगी मंदिरे आणि स्वागतकमानी उभारत आहोत. दरवर्षी इथे आले आणि इथली ढासळणारी शिल्पं पाहिली की त्रास होतो. काळजात धस्स होते. आज दिसणारे हे वैभव उद्या दिसेल का, असा प्रश्न सतावू लागतो. पळसदेवचे हे शिल्प-सौंदर्य शापित वाटू लागते!
..आम्ही काहीच करणार नाही का?