पुरंदर-वज्रगड पदभ्रमण
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी पुरंदर-वज्रगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. मुरारबाजी देशपांडे यांच्या ऐतिहासिक लढाईमुळे पुरंदरचा इतिहास प्रसिद्ध आहे. या गडाचे सौंदर्य पावसाळय़ात अधिकच खुलते. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा जंगल सफारी
ट्वाइन आऊटडोअर्सतर्फे उन्हाळी सुटीमध्ये १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान ताडोबा अभयारण्यामध्ये जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबाचे जंगल वाघांसाठी प्रसिद्ध आहे. वाघाबरोबर येथे बिबळ्या, मगर, अस्वल, रानकुत्रे, हरीण, सांबर असे वन्यप्राणी आढळतात. तसेच स्वर्गीय नर्तक, नीलपंख, गरुड, घुबड असे अनेक स्थानिक आणि विविध स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधीही या सफारीमध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- अर्चिस सहस्रबुद्धे ९८९२१७२४६७ किंवा पराग जोशी ९८३३५२४२४८.
आंबा घाट, खिद्रापूर सहल
सह्याद्रीच्या कुशीतील, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा हे एक निसर्गाचे वरदान लाभलेले असे जंगल! पाऊस सुरू झाला, की मलकापूरजवळील या निसर्गाला जणू जाग येते. जोरदार पाऊस, नाचणारे धबधबे आणि सोबतीला हिरवाईचा नजारा यामध्ये आंबा घाट हरवून जातो. नाना तऱ्हेचे पशुपक्षी, उभयचर प्राणी आणि वैविध्याने भारलेल्या वनस्पती यांनी हे आंबा घाटाचे जंगल निव्वळ भरून गेलेले आहे. अशा या घाटात, तिथल्या जंगलवाटांवर पदभ्रमण आणि वर्षां सहलीचे ‘निसर्ग टूर्स’तर्फे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १७ सप्टेंबर दरम्यानच्या या मोहिमेमध्ये आंबा जंगलाशिवाय खिद्रापूर येथील कोरीव कोपेश्वर मंदिर आणि नृसिंहवाडीतील दत्तमंदिरास भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email- abhijit.belhekar@expressindia.com