सापांच्या प्रणयक्रिडेसाठी एखादं पार्क बंद ठेवलंय असं कोणी सांगितलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सहाजिकच काही जणांना हे हस्यास्पद वाटेल तर काही जण आश्चर्यचकित होतील. परंतु फ्लोरिडा पार्कमध्ये खरंच अशी एक घटना घडली आहे. सापांच्या प्रणयक्रिडेसाठी चक्क एका पार्कमधील काही भाग बंद ठेवण्यात आला आहे. इतकंच नाही तर या फेसबुकच्या माध्यमातून हा पार्क बंद असण्याची माहितीही देण्यात आली आहे.

सापांच्या प्रणयक्रिडेचा एक विशिष्ट कालावधी असतो. त्यामुळे त्यांची प्रणयक्रिडा पाहणं हे फार दुर्मिळ आहे. परंतु अमेरिकेतील फ्लोरिडा पार्क येथे मोठ्या प्रमाणावर सापांची संख्या असून सध्या त्यांचा प्रणयक्रिडेचा काळ सुरु आहे. त्यामुळेच या पार्कमधील काही भाग बंद ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पर्यटकांच्या सुरक्षेपायी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्कमधील लेक हॉलिंग्सवर्थ (Lake Hollingsworth) तलावाजवळ मोठ्या संख्येने सापांची प्रणयक्रिडा सुरु असून हाच त्यांच्या मिलनाचा योग्य काळ असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि पर्यटकांच्या जीवाला हानी पोहोचू नये यासाठी हा भाग बंद ठेवण्यात आला आहे. परंतु पार्क व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

दरम्यान, या तलावातील पाण्यामध्येच सापांची प्रणयक्रिडा सुरु असते. त्यामुळेच या गोष्टीची माहिती प्रशासनाने फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. तसंच हे साप मुख्यत्वे करुन झाड्याच फांद्यावर किंवा तलावामध्ये असतात, असं सर्प विभागाकडून सांगण्यात येत आहे.