महिंद्रा अॅण्ड महिंद्रांचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटरवरील पोस्टमुळे कायमच चर्चेत असतात. पुन्हा एकदा ते चर्चेत आहेत मात्र यावेळेस ते चर्चेत येण्यामागील कारण आहे त्यांनी अभिनेता अनिल कपूरकडे केलेली एक विनंती. महिंद्रा यांचा ट्विटरवर अनिल कपूरशी झालेला संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

झालं असं की आनंद महिंद्रा यांनी माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नासकॉम या संघटनेच्या एका कार्यक्रमामध्ये एक भाषण दिले. या भाषणात त्यांनी भारतीयांची विचारसरणी ‘जुगाडकडून झकासकडे’ जात असल्याचे म्हटले. काम करायचं म्हणून करायचं या जुगाड प्रकारच्या विचारसणीकडून भारतीय आता झकास म्हणजेच जगावेगळा विचार करण्याकडे भर देत असल्याचे महिंद्रा यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं. या भाषणातील काही मुद्दे नासकॉमच्या ट्विटर अकाऊण्टवरुन पोस्ट करण्यात आले.

हे ट्विट कोट करुन रिट्विट करत आनंद महिंद्रा यांनी झकास या शब्दाचा उगम कसा झाला याबद्दल आपल्या फॉलोअर्सकडे विचारणा केली. तसेच झकास या शब्दाचा आपल्यासाठी काय अर्थ आहे हे ही त्यांनी सांगितले. “खरं तर मी (या भाषणामध्ये) Wow या इंग्रजी शब्दासाठी भारतीय भाषेतील शब्द शोधत होतो. त्याच अर्थाचा शब्द म्हणून मी झकास हा शब्द वापरला. मात्र या शब्दाचा उगम कसा झाला हे मला ठाऊक नसून तो केवळ महाराष्ट्रातच वापरला जातो का याचाही मला काही अंदाज नाही. कोणाला याबद्दल काही ठाऊक आहे का?,” असे ट्विट महिंद्रा यांनी केले.

महिंद्रा यांच्या या ट्विटला अभिनेता अनिल कपूर यांनी अगदी मजेशीर रिप्लाय दिला. यामध्ये मी हा शब्द माझ्या एका सिनेमामध्ये वापरला आणि तिथूनच तो लोकप्रिय झाल्याचे अनिल कपूर म्हणाले. “या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल मला सांगता येणार नाही. पण हा शब्द लोकप्रिय करण्यात माझा हातभार नक्कीच आहे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या युद्ध या सिनेमामध्ये मी साकारलेल्या भूमिकेसाठी चित्रपटात मी हा शब्द अनेकदा वापरला. उदाहणार्थ मी आनंद महिंद्रांचा खूप आदर करतो कारण माझ्या मते ते झकास आहेत,” असं ट्विट अनिल कपूर यांनी केले.

आनंद महिंद्रा यांनी अनिल कपूर यांच्या ट्विटची दखल घेत त्यांना उत्तर दिले. अनिल कपूर यांनी रिप्लाय म्हणून केलेले ट्विट कोट करुन रिट्विट करत महिंद्रा यांनी शब्दाचा अर्थ समजवून सांगितल्याबद्दल आभार मानले. “हाहाहाहा… या शब्दाचा इतक्या छान पद्धतीने अर्थ समजवून सांगितल्याबद्दल धन्यवाद. हा शब्द वापरुन मी बौद्धिक संपत्तीच्या (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तू मला कोर्टात खेचणार नाहीस अशी मी प्रार्थना करतो,” असे ट्विट महिंद्रा यांनी केले.

दरम्यान, या तिन्ही ट्विटवर वाचकांनाही मजेदार रिप्लाय करुन या दोघांमधील संवादाचा पुरेपुर आनंद घेतल्याचे या ट्विट्सला आलेल्या प्रतिसादावरुन दिसत आहे.