प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक वेळा ते ट्विटरवर काही व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असतात. विशेष म्हणजे त्यांचे प्रत्येक ट्विट हे चर्चेचा विषय ठरत असते. कारण बऱ्याच वेळा त्यांच्या ट्विटमध्ये एक महत्त्वाचा संदेश दडलेला असतो. नुकतंच आनंद महेंद्रा यांनी एक ट्विट करुन मोबाइल फोन चार्ज करण्याची नवीन आणि तितकीच भन्नाट कल्पना सांगितली. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: हा प्रयोग करुन पाहिला आहे.

बऱ्याच वेळा फोन चार्ज करताना अनेक अडचणी येतात. कधी चार्जिंग पॉईंटची समस्या असते. कधी लाईट नसतात तर बऱ्याच वेळा चार्जिंग पॉईट हा जमिनीपासून उंचावर असल्यामुळे चार्जरची वायर कमी पडते. फोन चार्ज करताना वायर कमी पडली की मग सुरू होतात ना-नाविध प्रकारचे प्रयोग. यामध्ये काही जण चार्जर प्लगमध्ये लावून त्यावर फोन ठेवतात. तर काही जण फोन पूर्ण चार्ज होईपर्यंत हातात धरुन उभे राहतात. मात्र या दोन्ही गोष्टी धोकादायक आहेत. विशेष म्हणजे यावर आनंद महिंद्रा यांनी भन्नाट उपाय शोधून काढला आहे. हा प्रयोग त्यांनी स्वत: केला असून ट्विटरवर याचा एक फोटोही शेअर केला आहे.

महिंद्रा यांनी चार्जर प्लगमध्ये बसवला आणि त्यावर शूज अडकवला. त्यानंतर चार्जरला अडकलेल्या या शूजमध्ये त्यांनी फोन चार्ज करायला ठेवला.  यावेळी त्यांनी whatsappwonderbox मध्ये आलेला एक फोटो शेअर करत हा प्रयोग केल्यानंतर त्यांचा अनुभव कसा होता हे सांगितलं.

“काही दिवसांपूर्वी मी गोव्यात गेलो होतो. तेव्हा मी फोन चार्ज करायची ही नवीन पद्धत ट्राय करुन पाहिली आणि माझं काम सोप्प झालं.( ही भन्नाट कल्पना मला #whatsappwonderbox वरुन सुचली होती. एकाने हा फोटो तेथे पोस्ट केला होता.) आतापर्यंत माझा फोन चार्ज करताना कधीच इतका कंफर्टेबल वाटला नव्हता”, असं ट्विट आनंद महेंद्रा यांनी केलं.


दरम्यान, आनंद महेंद्रा प्रत्येक वेळी सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. समाजात घडणाऱ्या गोष्टी असो किंवा त्यांना आवडलेली एखादी गोष्ट ते लगेच ट्विटवर त्यावर भाष्य करतात.