दक्षिण आफ्रिका देश तेथील वन्यसंपत्ती आणि जैवविविधतेसाठी ओळखला जातो. जगभरातील पर्यटक तेथे वन्य प्राणी पाहण्यासाठी येतात. मात्र एकीकडे पर्यटन हाच प्रमुख व्यवसायांपैकी एक असतानाच दुसरीकडे याच पर्यावरण पर्यटनाला चोरट्या शिकारीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. अनेकदा लपूनछपून प्राण्यांची कत्तल होण्याच्या बातम्या समोर येत असतात. याच शिकारीचा एक धक्कादायक फोटो समोर आला आहे.

ड्रोनच्या मदतीने काढण्यात आलेल्या या फोटोमध्ये शिकारीनंतर हत्तीचे धड आणि सोंड वेगळे केल्याचे दिसत आहे. हस्तीदंतांसाठी हत्तीची शिकार केल्यानंतर त्याचे शीर धडापासून वेगळे करुन शिकाऱ्यांनी हस्तीदंत चोरल्याचे फोटोवरुन स्पष्ट होत आहे. बोट्सवाना देशातील हा फोटो असून या फोटोमुळे शिकारी कशाप्रकारे निघृणपणे प्राण्यांची शिकार करतात हेच नव्याने समोर आले आहे. डॉक्युमेंट्री तयार करणाऱ्या जस्टीन सुलेव्हीन यांनी हा फोटो काढला आहे. ‘नुकतीच या प्रदेशात हत्तीची शिकार झाली असल्याचे मला स्थानिकांनी सांगितल्यानंतर मी त्यांना मला घटनास्थळी घेऊन जाण्यास सांगितले. या शिकारीचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून मी ड्रोनच्या माध्यमातून फोटो काढला.’ असं जस्टीनने सांगितले.

हत्तींची शिकार

‘मेट्रो न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बोट्सवाना या देशामध्ये बराच मोठा गवताळ प्रदेश आहे. येथे हत्तींची संख्या मोठी आहे. शिकारी या हत्तीची शिकार केल्यानंतर झाड कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चेनमशीनने त्यांची सोंड आणि धड एकमेकांपासून वेगळे करतात. हत्तीच्या सोंडेतून हस्तीदंत कापून घेऊन हत्तीचा देह असाच उघड्यावर टाकून पळ काढतात.’

बोट्सवाना सरकारने नुकतेच शिकारीवरील निर्बंध मागे घेतले आहेत. हत्तींची संख्या वाढल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होते असे हे निर्बंध उठवण्यामागील कारण देण्यात आले आहे. मागील पाच वर्षांमध्ये बोट्सवानामध्ये चोरट्या शिकारीचे प्रमाण ५३९ टक्कांनी वाढल्यानंतरही सरकारने शिकारीवरील बंदी उठल्याने शिकाऱ्यांना मोकळे रान मिळाल्याचे ‘मेट्रो न्यूज’ने म्हटले आहे.

बोट्सवानामध्ये हिऱ्यांच्या खाणीनंतर पर्यटन हाच सर्वात मोठा उद्योग आहे. येथील वन्य प्राणी त्यातही हत्ती पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथील गवताळ पठारांना भेट देतात. मात्र सरकारचे धोरण शिकाऱ्यांना पोषक असल्याने पर्यटन व्यवसाय धोक्यात आल्याची टिका होताना दिसते.