देशातील काळ्या पैशाला लगााम घालण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. जुन्या नोटा बदली करुन घेण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या नागरिकांची गर्दी बँक कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देशातील चलन कलहाची समस्या लवकरात लवकर दुर करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांना अधिक मेहनत करावी लागत आहे. सुट्टीच्या दिवशीचे काम आणि नियोजित वेळेपेक्षा अधिक काम करुन नागरिकांना सेवा देणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांचे एका आजीबाईंनी अनोख्या पद्धतीने आभार मानले. लखनऊमधील बँकेत लांबच्या लांबा लागलेल्या रांगामधून एक वयोवृद्ध महिला पैसे घेण्यासाठी नव्हे तर चक्क नागरिकांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी दाखल झाली होती.

सोशल मीडियामध्ये लोकप्रिय असणाऱ्या फेसबुकच्या माध्यमातून बँक कर्मचाऱ्यांना आजीबाईना दिलेला सलाम व्हायरल होताना दिसत आहे. प्रशांत सिंग नावाच्या एका फेसबुक वापरकर्त्याने बँक कर्मचाऱ्यांचा थकवा घालविणाऱ्या  आजीबाईंचे दर्शन करुन दिले आहे. या व्हिडिओमध्ये आजीबाईंच्या हातात गुलाबांची अनेक फुले दिसत आहेत. आजीबाई प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जागेवर जाऊन त्यांच्या कामाचे कौतुक करताना दिसते. बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी काम करणे म्हणजे कठोर काम असल्याचे या आजीबाईना वाटत आहे. देशाची संरक्षणासाठी सीमारेषेवर जवान ज्या पद्धतीने देशसेवेचे काम चोख बजावतात, अगदी त्याचप्रमाणे बँकेतील कर्मचारी देखील देशसेवा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला अचानकपणे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याची घोषणा केली होती. या निर्णयानंतर देशात चलन कलह निर्माण झाला आहे. काळ्या पैशाच्या लढाईमध्ये सामान्य जनतेचे अतोनात हाल होताना दिसत आहे. बँकेबाहेर दिसणाऱ्या रांगामुळे कर्मचाऱ्यांच्या तणावामध्ये वाढ होत आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे अनेक बँक कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या.  काळ्या पैशाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात नोटांची चर्चा रंगत आहे. नोटांच्या चर्चेनंतर बँकाबाहेर लागलेल्या रांगाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जनता त्रस्त झाली असताना बँक कर्मचाऱ्यांना देखील तणावाचा सामना करावा लागत आहे. मोदी सरकारने जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी जनतेला ५० दिवसांची मुदत दिली आहे. परिणामी आणखी काही दिवस जनतेसोबत बँक कर्मचाऱ्यांना देखील चलन कलहाचा त्रास सहन करावा लागणार आहे.