खरंतर सार्वजिक ठिकाणी वावरताना नागरिकांना ज्या काही तक्रारी आणि त्रास सहन करावा लागतो त्या तक्रारी अनेक जण पंतप्रधान कार्यालयाकडे लिहून पाठवतात. पंतप्रधान कार्यालयाकडूनही या तक्रारींवर उत्तर देत ती निवारण्याची हमी दिली जाते. पण काही लोक या तक्रारीपेक्षा आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या तक्रारीसुद्धा पंतप्रधान कार्यालयकडे लिहून पाठवू लागल्याचे समोर आहे. चंदीगढमधल्या एका तरूणाने देखील असाच प्रकार केला आहे. मॅकॅनिकल इंजिनिअर असलेल्या या तरूणाचे एका नर्सवर प्रेम आहे. या दोघांनाही लग्न करायचे आहे. पण नेहमीप्रमाणे त्यांच्याही लव्हस्टोरीमध्ये ट्विस्ट आहे. मुलींच्या कुटुंबियांना हे लग्न काही मान्य नाही, तेव्हा लग्नाला कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकते ती म्हणजे नरेंद्र मोदी असे या तरूणाला वाटले. मग काय या तरूणाने मोदींना पत्र लिहून मदत करण्याची विनंती केली आहे.

वाचा : फ्रान्सच्या अध्यक्षांची ‘स्कूलवाली लव्हस्टोरी; २५ वर्षांनी मोठ्या असलेल्या शिक्षिकेशी केला विवाह

वाचा : राजस्थानचे शेतकरी अॅमेझॉनवर विकतायेत गोवऱ्या

आपले एका मुलीवर प्रेम असून कुटुंबिय लग्नाला विरोध करत आहेत. तेव्हा मोदींनी काही माणसं या मुलीच्या घरी पाठवून द्यावीत. या माणसांनी तिच्या कुटुंबियांना लग्नासाठी राजी करावे, अशीही विनंती त्याने केली आहे. मोदींची माणसं आहेत म्हटल्यावर तिच्या घरचे नक्की ऐकतील आणि लग्नासाठी तयार होतील, असेही त्याने पत्रात लिहिले आहे. आता अशा वैयक्तिक आयुष्यातल्या तक्रारी लिहून पाठवणारा हा काही पहिलाच नाही. चंदीगढच्या एका अधिकाऱ्याने ‘अमर उजाला’ला दिलेल्या माहितीनुसार अशा तक्रारी लिहणारे शेकडो लोक आहेत. यातल्या अनेक तक्रारी तर खोट्याही असतात असा दावा त्यांनी केला आहे. चंदीगढमध्ये शासकीय कार्यालयात दर महिन्याला ४०० हून अधिक तक्रारी येतात, यातल्या अनेक तक्रारी या खासगी आयुष्याशी निगडीत असल्याचेही इथल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.