पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजेला विशेष महत्व असते. या राज्यामध्ये नवरात्री हा केवळ उत्सव नसून तो येथील संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे दिसून येते. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील कलाकारांनी घडवलेल्या देवीच्या मुर्ती, मोठ्या आकाराचे मंडप देशभरामध्ये चर्चेचे विषय असतात. हे मंडप उभे करण्याचे काम कुशल कारागीर करतात. अनेकदा या मंडपांमधील सजावट ही चर्चेत असणाऱ्या विषयांवर आधारित असते. मागील काही वर्षांपासून सामान्यांना भेडसावणारे प्रश्न आणि समस्या या सजावटीमधून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.

यंदा मात्र करोनामुळे नेहमीप्रमाणे मंडपांमधील सजावट पाहण्यासाठी गर्दी होणार नसून अगदी साध्या पद्धतीने नरात्रोत्सव साजरा केला जात आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करुनही अनेक ठिकाणी सालाबादप्रमाणे मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. दक्षिण कोलकात्यामधील बेहाला येथील एका मोठ्या मंडळाच्या दुर्गा पूजा समितीने यंदा आपल्या मंडळाच्या वतीने मंडपात दुर्गा मातेऐवजी एका स्थलांतरित मजूर असणाऱ्या महिलेची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आलं होतं. या महिलेच्या कडेवर एक लहान मूल असल्याचे दाखवण्यात आलं आहे. पूजा समितीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचे आणि त्रासाचे प्रतिक म्हणून आम्ही ही मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मूर्ती म्हणजे स्थलांतरित मजुरांचे केवळ दु:खच नाही तर त्यांची जिद्द आणि हिंमत याचेही प्रतिक असल्याचे मंडपाने स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालप्रमाणेच आसाममधील एका कालाकाराने मेडीकल वेस्टपासून दुर्गा मातेची मूर्ती साकारली आहे. सानजीब बास्क या कलाकाराने जवळजवळ दोन महिन्यांचे कष्ट घेऊन दुर्गा मातेची मूर्ती साकारली आहे. यासाठी त्याने ३० हजार कॅप्सुल्स आणि सिरिंजचा वापर केला आहे.

अशाच ऐका वेगळ्या कलाकृतीमध्ये पश्चिम बंगालमधील बेहरामपूरमधील मंडपातील मूर्तीचाही समावेश झाला आहे. इंटरनेटवर या मंडपातील दुर्गा मातेच्या मूर्तीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या मूर्तीच्या भाग असणारा एक चेहरा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारा आहे.

या मंडपातील दुर्गा मातेच्या मूर्तीमध्ये देवीने नाश केलेला आसुर म्हणून चीनी राष्ट्राध्यक्षांचे मुंडके दाखवण्यात आले आहे. बंगला हंट या बंगाली वेबसाईटच्या माहितीनुसार अश्मी पाल या कलाकाराने ही कलाकृती साकारली आहे.


पश्चिम बंगालमध्ये साकरण्यात येणाऱ्या देवीच्या मूर्तीमध्ये देवी ही तिच्या वाहनावर म्हणजेच सिंहावर आरुढ असते. केंद्रभागी असणाऱ्या देवीच्या आजूबाजूला तिची मुलं यामध्ये लक्ष्मी, सरस्वती, गणपती, कार्तिक यांच्या मुर्ती असतात. तर पायाखाली शीर नसणारा आसूर असतो. या मूर्तीमध्ये आसुराच्या धडाजवळ जिनपिंग यांच्या चेहऱ्याशी समानता असणारा चेहरा दाखवण्यात आला आहे. याच मूर्तीचा फोटो आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.