तंत्रज्ञान श्रेत्रातील अव्वल कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी २०१८ मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या शब्दासंदर्भातील माहिती एक ट्विट करुन दिली आहे. दर वर्षी गुगलकडून #YearInSearch या हॅशटॅगसहित वेगवेगळ्या विभागांमध्ये कोणत्या गोष्टी वर्षभरात नेटकऱ्यांनी सर्च केले याबद्दलची माहिती दिली जाते. या वर्षी सर्वाधिक सर्च झालेला शब्द ठरला आहे Good. गुड हा शब्द सर्वाधिक सर्च झालेला शब्द ठरल्याने पिचाई यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये २०१८ मधील काही Good गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये पिचाई म्हणतात, ‘चांगले वाईट अनुभव देणाऱ्या या वर्षामध्ये सर्वाधिक सर्च झालेला शब्द ठरला आहे गुड. चला तर २०१८ मधील याच सर्व गुड गोष्टी आणि या गोष्टी कोणी सर्च केल्या त्या गुड लोकांवर या व्हिडीओच्या माध्यमातून नजर टाकुयात.’

या व्हिडीओमध्ये वर्षभरात गुगलवर सर्च करण्यात आलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओमधील काही भाग एकत्रित करुन पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये जगभरात २०१८ मध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या आणि सकारात्मक बातम्या, चांगला नागरिक कसे बनावे यासंदर्भातील गोष्टी, चांगले व्हिडीओ, चांगल्या मनोरंजन करणाऱ्या गोष्टी, एखाद्यासाठी चांगला आदर्श कसे व्हावे या आणि अशा बऱ्याच विषयांवरील व्हिडीओंसंदर्भातील सर्च देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. व्हिडीओच्या शेवटी चांगल्या गोष्टी सर्च करणे नेहमीच फायद्याचे असते त्यामुळे सर्च करत राहा असा संदेशही गुगलने नेटकऱ्यांना दिला आहे.