देशाच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील प्रसिद्ध ताज पॅलेस हॉटेलच्या साखळीनेही एक विशेष गोष्ट आयोजित केली आहे. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री ताज हॉटेलमध्ये जेवणात विशेष पदार्थांची मेजवानी होती. यावेळी तयार करण्यात आलेले पदार्थ आज म्हणजेच सोमवारी १४ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा चाखण्याची संधी खव्वयांना मिळणार आहे. मात्र १९४७ मध्ये करण्यात आलेल्या या पदार्थांना आधुनिक स्वरुप देण्यात येणार असल्याचे दिल्लीतील ताज पॅलेसचे कार्यकारी शेफ राजेश वाधवा यांनी सांगितले.

ते म्हणाले, मुंबईतील जुन्या नोंदींमध्ये या पदार्थांची नावे सापडली. त्यावरुन आजचा मेन्यू तयार केला जाणार आहे. ही गोष्ट खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार असून त्यासाठी ताज हॉटेलच्या अनेक हॉटेलमध्ये काळजीपूर्वक हा मेन्यू तयार करण्यात येणार आहे. यामध्ये पदार्थ तयार करताना सत्तर वर्षांपूर्वी वापरण्यात आलेल्या अन्नपदार्थांची योग्य ती माहिती घेऊन मगच ते पदार्थ तयार केले जाणार आहेत.

यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या अनोख्या मेन्यूची किंमत १ हजार ९४७ रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ असतील. याशिवाय भारतीय सशस्त्र दलामधील सेवेत असलेल्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना देशभरातील सर्व ठिकाणच्या ताज हॉटेलमध्ये ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.