उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस कोसळत आहेत. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पावसाचा जोर किती आहे याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील बालीयामधील कहापूर गावामध्ये एक घर अवघ्या काही क्षणांमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे एक घर दिसत आहे. सिमेंट काँक्रीटचे घर अवघ्या काही क्षणांमध्ये कोलमडून पडते. या दूर्घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही असंही एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे घर गंगा नदीच्या किनारी आहे. या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे या परिसरातील बरीचशी माती वाहून गेल्याने घर पडल्याचे बोलले जात आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमजवळील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. गंगानगर गावातील २०० गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.