स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामरा हा विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनामुळे चर्चेत आला आहे. एका विमानात अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा एकत्र प्रवास करत होते. यावेळी कुणाल कामरानं अर्णब यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यासदर्भातील एक व्हिडीओ त्यानं ट्विटवर शेअर केला. अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विमान कंपनी इंडिगोनं त्याच्यावर सहा महिन्यांची तर एअर इंडियानं त्याच्या विमान प्रवासावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.

“इंडिगोच्या विमानात कुणाल कामराची वर्तणूक स्वीकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत त्याच्या विमान प्रवासावर बंदी घालण्यात येत आहे,” असं एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आलं. यापूर्वी इंडिगोनंही कुणाल कामरावर सहा महिन्यांच्या विमान प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील त्यांचं वर्तणूक पाहता त्यांच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, कंपनीनं ट्वीटरद्वारे दिली. “अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तीक टीका करण्यात येऊ नये. यामुळे आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असं इंडिगोकडून सांगण्यात आलं.

“एखाद्या व्यक्तीला त्रास होईल आणि त्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशी विमानात केलेली वर्तणूक स्वीकारली जाऊ शकत नाही. यामुळे विमातील प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. आमच्याकडे इतर विमान कंपन्यांना संबंधित व्यक्तीवर समान बंधनं घालण्याचा सल्ला देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केलं. त्यांनी ट्वीटरवरून आपली प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा – Social Viral: जेव्हा अर्णब गोस्वामींना कुणाल कामरा विमानात भिडतो…

काय आहे प्रकरण?
“आज मी लखनौच्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना मी नम्रतेनं बोलण्याची विनंती केली. पहिल्यांदा त्यांनी फोनवर बोलत असल्याचं नाटक केलं. मी त्यांचा फोन संपण्याची वाट पाहिली,” असं कुणाल कामरानं आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

हे सर्व मी माझ्या हिरोसाठी केलं आहे. रोहित वेमुल्लासाठी केलं आहे, असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यावेळी कुणाल कामरानं अर्णब गोस्वामी यांनी काही प्रश्न विचारले. परंतु त्यांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. “मी २० सेकंदात आपल्या जागेवर येऊन बसलो. मी वैयक्तिकरित्या सर्व क्रू मेंबर्सची माफी मागितली. मला नाही वाटत मी कोणताही गुन्हा केला आहे. मी हे सर्व रोहित वेमुल्लासाठी केलं. मी एक व्यक्ती सोडून सर्वाची माफी मागितली,” असंही त्यानं नमूद केलं आहे.