एक गुन्हा लपवण्यासाठी अनेक गुन्हे करावे लागतात असं म्हटलं जातं. याच वाक्याला खरी करणारी घटना नुकतीच समोर आली आहे. तुरुंगवास टाळण्यासाठी एका व्यक्तीने स्वत:च्याच मृत्यूचे नाटक केलं. मात्र त्याचा हा बनाव पकडला गेला तो एका स्पेलिंग मिस्टेक म्हणजेच शब्द लिहिताना झालेल्या चुकीमुळे.

ही घटना घडली न्यू यॉर्कमध्ये येथील २५ वर्षीय रॉबर्ट बेरर्जर याने आपल्या वकिलाच्या माध्यमातून कोर्टामध्ये स्वत:च्याच मृत्यूचा खोटा दाखला सादर केला. मात्र या दाखल्यावर असणाऱ्या एका चुकीमुळे न्यायाधिशांना शंका आली आणि रॉबर्टची चोरी पकडली होती. त्यामुळे आता रॉबर्टचा चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. ज्या चोरीच्या गुन्ह्यासाठी त्याला कमी कालावधीची शिक्षा झाली असती त्या शिक्षेबरोबरच आता खोटा पुरावा सादर करणे आणि न्यायालयाची फसवणूक करण्याच्या गुन्ह्याखाली त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. “आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा टाळण्यासाठी लोकं काय काय करतात हे पाहून आता मला त्याबद्दल अजिबात आश्चर्य वाटत नाही,” असं मत नासौ कंट्री डिस्ट्रीक अटॉर्नी मेडिलाइन्स सिंगास यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना व्यक्त केलं आहे.

काय चुकलं होतं?

रॉबर्टने सादर केलेल्या खोट्या मृत्यूच्या दाखल्यामध्ये सर्व काही अगदी ठीक होतं. मात्र त्याने ज्या खात्याकडून हा मृत्यूचा दाखला दिला जातो त्याचेच नाव चुकीचे लिहिले होते. “New Jersey department of health office of vital statistics and registry” हे लिहिताना मृत्यूपत्रावर शेवटच्या शब्दामध्ये चूक झाली. registry हे स्पेलिंग regsitry असं लिहिल्याचं लक्षात आल्यानंतर रॉबर्टचा बनाव उघडकीस आला.
फोटो : AP

आता या प्रकरणी रॉबर्टला चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.