जगभरात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो, पण अमेरिकेतून मात्र डॉक्टरांचं एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. अमेरिकेच्या मिशिगन येथे एका रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वतःच्या पेशाला काळिमा फासत रुग्णांसोबत एक अत्यंत घृणास्पद ‘गेम’ खेळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिशिगनच्या स्पेक्ट्रम हॉस्पिटलमधील काही डॉक्टर इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून ‘प्राइस इज राइट’ हा गेम खेळताना दिसले, इतकंच नाही तर याचं थेट प्रसारणही सुरू होतं. या दरम्यान एका डॉक्टरने तर रुग्णाचे अवयव वेगळे केले आणि कॅमेऱ्यासमोर दाखवून लाइव्ह बघणाऱ्यांना त्याची किंमत विचारली. अवयवाची किंमत किंवा वजन ओळखण्याचा घृणास्पद गेम ते खेळत होते.

ही धक्कादायक घटना तेथील स्थानिक टीव्ही चॅनल वूड टीव्हीने दाखवली. व्हिडिओत एक डॉक्टर रुग्णाचे अवयव दाखवून त्याचं वजन विचारतो. इतकंच नाही तर, शस्त्रक्रीयेदरम्यानच रुग्णाच्या अवयवांचे फोटो काढण्यात आले आणि ते इन्स्टाग्राम लाइव्हवर दाखवण्यात आले. स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये हा सर्व प्रकार घडला. विशेष म्हणजे एकट्या मिशिगनमध्ये स्पेक्ट्रम हेल्थचे १४ हॉस्पिटल असून स्पेक्ट्रम हेल्थ एक मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. आता या धक्कादायक घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून इन्स्टाग्रामवरुन त्या धक्कादायक गेमचा व्हिडिओही हटवण्यात आला आहे.