‘मिस आफ्रिका २०१८’ या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम सोहळ्यादरम्यान स्पर्धेची विजेती ठरलेल्या सौंदर्यवतीच्या केसांना आग लागली. या दुर्घटनेत किताब पटकावणारी सौंदर्यवती डॉरकस कँसिंडे थोडक्यात बचावली आहे. या सोहळ्यादरम्यान सुरू असलेल्या आतिशबाजीनं ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान आयोजकांनी प्रसंगावधानता दाखवत ही आग विझवली आणि तिला स्टेजवरून बाजूला नेलं.

डॉरकस २४ वर्षांची आहे. नायजेरीया येथे पार पडलेल्या मिस आफ्रिका २०१८ सौंदर्यस्पर्धेत तिनं मिस आफ्रिका २०१८ चा किताब पटकावला. तिच्या नावाची घोषणा झाल्यानंतर स्टेजवर मोठी आतिशबाजी करण्यात आली. यावेळी स्टेजवर उभ्या असलेल्या डॉरकसच्या केसांनाही आग लागली. मुकूट परिधान करण्याच्या समारंभावेळी हा प्रकार घडला. सारं काही अगदी अनपेक्षितपणे आणि अवघ्या काही सेकंदात घडलं. स्टेजवर असलेल्या आयोजकांनी प्रसंगावधानता दाखवत ही आग पटकन विझवली.

त्यानंतर डॉरकसला उपचारांसाठी नेण्यात आलं. सुदैवानं ती पुर्णपणे बरी आहे. डॉरकसनं स्वत: सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंबधीची माहिती दिली आहे.