अत्याधुनिक दिल्ली मेट्रोमधून तुम्ही प्रवास करत आहात आणि याच प्रवासादरम्यान प्रवासी सोडून एखादे माकड तुमच्या बाजूला येऊन बसले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ? साहजिकच आहे सर्वसामान्य प्रवासी हा प्रकार पाहून घाबरुन जाईल. मात्र दिल्ली मेट्रोमध्ये घडलेल्या एका प्रकारामध्ये प्रवासी घाबरुन न जाता या माकडलिला पाहून पोट धरुन हसू लागले होते. या घटनेचा  एक व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे.

सामान्यत: माकड झाडांवर किंवा घराच्या पत्र्यावर एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी उड्या मारताना दिसून येतात. पण हेच माकड जर मेट्रोमध्ये मस्तपैकी खुर्चीवर बसून प्रवास करत असेल तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. विशेष म्हणजे ती दिल्लीची मेट्रो असेल तर अजिबातच कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र हे खरं ठरलं आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये एका माकडाने अचानक प्रवेश केला होता. त्याच्या अचानक येण्यामुळे प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. एवढेच नाही तर प्रवाशांची गर्दी पाहून हे माकडदेखील घाबरले होते. या भितीपोटी हे माकड एका खांबाला धरुन बसले होते. विशेष म्हणजे या माकडाला प्रवाशांनी कोणतीही इजा न पोहोचविल्यामुळे माकडाला त्यांच्याप्रती विश्वासाची भावना निर्माण झाली. त्यामुळे हे माकडदेखील आपल्या माकडलिला दाखवत एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी उड्या मारू लागले.

दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये हे माकड या डब्ब्यातून त्या डब्ब्यात मस्त उड्या मारणा-या या माकडाला प्रथम घाबरणा-या प्रवाशांनीच त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मात्र असे प्रथमच झाले नसून यापूर्वीही मेट्रोमध्ये असेच एक माकड आले होते. परंतु यावेळच्या माकडाने तर प्रवाशांना हसून हसून पुरते वेडे करुन सोडले होते.