राष्ट्रपती भवनातल्या मुघल गार्डनची शानच काही और. ही बाग म्हणजे ऐश्वर्यपूर्ण सौंदर्याचा नजराणाच जणू. विविध रंगाची, शेकडो प्रजातींची फुलंझाडं, फळझाडं आणि इथलं सौंदर्य पाहिलं की भूलोकीच्या नंदनवनी असल्यासारखं वाटतं. ही मुघल बाग म्हणजे देशातल्या अप्रतिम बागेपैकी एक म्हणून ओळखली जाते. या बागेत राजस्थानच्या एका शेतकऱ्याने असं आंब्याचं झाड लावलं आहे ज्याला वर्षांच्या कोणात्याही मौसमात फळं लागू शकतात. विशेष म्हणजे आंब्याच्या इतर वृक्षाप्रमाणे हे झाड डेरेदार नाही. एका छोट्याशा कुंडीत देखील हे झाड बहरू शकते. आंब्याच्या या प्रजातीचे नाव आहे ‘सदाबहार आम’.

आंबे साधारण मार्च, एप्रिल, मे महिन्याच्या कालावधीत उपलब्ध असतात, आता आंबा खायचा म्हटलं तर वर्षभर त्याची वाट पाहावी लागते. पण राष्ट्रपती भवनात असलेल्या या सदाबहार आंब्याच्या झाडामुळे वर्षाचे बाराही महिने आंब्याचा स्वाद चाखता येणार आहे. आंब्याची ही नवी प्रजाती कोटामध्ये राहाणाऱ्या किशन सुमन या प्रयोगशील शेतकऱ्याने तयार केली आहे. किशन यांना आंब्याची नवी प्रजाती तयार केल्याबद्दल ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’तर्फे सन्मानित करण्यात आले. या प्रयोगशील शेतकऱ्याची दखल खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील घेतली. राष्ट्रपतींच्या विनंतीला मान देऊनच सुमन यांनी राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनमध्ये आंब्याच्या या नवा प्रजातीचे वृक्षारोपण केले. सुमन यांच्या गावाकडल्या शेतात ३०० आंब्याची झाडं आहेत आणि हे आंबे हरियाणा, छत्तीसगढ, दिल्ली यासारख्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवले जातात.