पृथ्वीभोवती मागील ५४ वर्षांपासून फिरत असणाऱ्या गोष्टीसंदर्भात अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने मोठा खुलासा केला आहे. मागील अर्ध्या शतकाहून अधिक काळ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारी रहस्यमय गोष्ट ही कोणताही लघुग्रह (अ‍ॅस्टेरॉईड) नसून जुनं रॉकेट असल्याचं नासाने म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट प्रेसने दिलं आहे.

कॅलिफॉर्नियामधील नासाच्या जेट प्रोप्युल्शन लेबॉरीट्रीने दिलेल्या माहितीनुसार हवाईमधील टेलिस्कोपच्या मदतीने या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूचं निरिक्षण करण्यात आलं. निरिक्षणानंतर पृथ्वीभोवती फिरणारी ही गोष्ट म्हणजे जुनं रॉकेट असल्याचं स्पष्ट झालं. सप्टेंबर महिन्यामध्ये हे रॉकेट पहिल्यांदा दिसलं तेव्हा त्याला लघुग्रहाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र नासातील लघुग्रह विशेतज्ज्ञ असणाऱ्या पॉल कॉर्डस यांना ही वस्तू लघुग्रह नसून सर्व्हेयर टू या मोहिमेतील रॉकेटचा भाग असल्याची शंका आली. सर्व्हेयर टू ही मोहीम १९९६ साली चंद्रावर पाठवण्यात आलेली मोहीम होती जी अपयशी ठरलेली.

आकारामानावरुन हा रॉकेटचा तुकडा असल्याचा अंदाज बांदण्यात आला होता. या वस्तूचा आकार हा लांबीला  ३२ फूट लांब आणि रुंदीला १० फूट असल्याचे सांगण्यात आलं. अ‍ॅरेझॉना विद्यापिठातील विष्णू रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील टीमने इन्फ्रारेड टेलीस्कोपच्या मदतीने केलेल्या पहाणीमध्ये पॉल यांनी व्यक्त केलेली शंका खरी ठरली. हवाईमधील या टेलिस्कोपमधून केलेल्या पहाणीमध्ये पृथ्वीभोवती फिरणारी ही गोष्ट म्हणजे रॉकेटचा भाग असून १९७१ पासून तो पृथ्वीभोवती फिरत असल्याचं स्पष्ट झालं. एपीला ईमेलवर दिलेल्या रिप्लायमध्ये पॉल यांनी ही आनंदाची बातमी असून टीमने एकत्र काम केल्याने हे कोडं सुटू शकलं असं म्हटलं आहे.

पहिल्यांदा ही वस्तू आढळली तेव्हा तो लघुग्रह आहे असं समजून त्याला २०२० एसओ असं नाव देण्यात आलं होतं. गुरुवारी ही वस्तू पृथ्वीच्या सर्वात जवळून म्हणजेच ५० हजार किमीवरुन गेला.