विधानसभेचा निकाल लागू तीन आठवड्यांनंतरही राज्यामध्ये सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. त्यातच राज्यातील विधीमंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा आणि बैठकींचे सत्र सुरु आहे. बुधवाराही राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या अनेक बैठकी झाल्या. मात्र त्याआधी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या आवारामधील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनाच्या आवारातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना वाहिली. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रसंगाची चर्चा दिवसभर रंगली.

वसंतदादांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पवारांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व नेतेमंडळी रवाना झाले. मात्र विधानभवनाबाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्व आमदार आणि उपस्थित प्रसारमाध्यमांच्या फोटोग्राफर्सने केलेल्या आग्रहास्तव पवारांनी सर्वांबरोबर एक फोटो काढला. पवारांनी फोटो काढण्यासाठी होकार दिल्यानंतर सर्वजण पवारांच्या आजूबाजूला रांग करुन उभे राहिले. त्यावेळी विधानभवनाचा सुरक्षारक्षक एका कोपऱ्यामध्ये मागे सरकला. ही गोष्ट पवारांच्या नजरेमधून सुटली नाही. त्यांनी स्वत: त्या सुरक्षारक्षकाला बोलावून घेतलं आणि सर्व नेत्यांबरोबर थेट पहिल्या रांगेत उभं राहण्यास सांगितलं. तो सुरक्षारक्षक फोटोसाठी पहिल्या रांगेत उभा राहिल्यानंतर पवारांनी फोटो काढल्यास सांगितलं. पवारांच्या या कृतीमुळे काही क्षण राष्ट्रवादीचे नेतेही गोंधळले पण सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसले. या घटनेमुळे त्या सुरक्षारक्षकाला अगदी गहिवरुन आले. या घटनेचीच चर्चा विधानभवनाच्या आवारामध्ये दिवसभर रंगली होती. हा फोटो सोशल मिडियावरही व्हायरल झाला आहे.

शरद पवार यांनी अशाप्रकारे सामान्यांसाठी एखादी गोष्ट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पवारांचा महाराष्ट्रभरामध्ये मोठा जनसंपर्क आहे. अनेकदा ते दौऱ्यावर असताना त्यांना जुनी माणसं भेटायला येतात तेव्हा ते त्यांनी नावाने ओळखतात. यासंदर्भातील त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर अनेकदा व्हायरल झाल्याचे पहायला मिळते.