सध्या जगभरात करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वच देशांनी निरनिराळ्या पर्यायांचा अवलंब केला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता अशा अनेक गोष्टींपासून करोनाला आपण रोखू शकतो. एकीकडे करोनापासून बचावासाठी नवनव्या साधनांचा शोध सुरू आहे, तर दुसरीकडे सामान्य लोकंही आपापल्या परीनं यावर काही ना काही जुगाड शोधताना दिसत आहे. सध्या अशाच एका करोना छत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचाही विषय ठरत आहे.

हर्ष गोयंका यांनीदेखील करोना छत्रीचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात एक व्यक्ती आपल्यासोबत एक छत्री घेऊन जाताना दिसत आहे. तसंच दुसरी व्यक्ती समोरून येताना दिसताच छत्रीला लावलेलं प्लास्टीकही ती व्यक्ती खाली करते. या व्हिडीओला गोयंका यांनी करोना अंब्रेला असं कॅप्शनही दिलं आहे. दरम्यान, काही युझर्सनं आपल्याला ही छत्री आवडल्याचं म्हटलं आहे. तर काही जणांनी हा नवा शोध असल्याचंही म्हटलंय. सोशल मीडियावर या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळत आहेत.

सध्या करोनानं जगभरात मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे. जगभरात आतापर्यंत एक कोटी पेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक करोनाग्रस्तांची संख्या ब्राझिलमध्ये आहे. तर भारतातही मोठ्या प्रमाणात करोनानं थैमान घातलं आहे. भारतातही करोनाबाधितांची संख्या तब्बल सात लाखांच्या वर गेली आहे. तर मृतांचा आकडाही वाढला आहे.