इंटरनेट या माध्यमाचा अनेकजण गैरवापर करत असताना या माध्यमाचा चांगल्याप्रकारे उपयोगही होताना दिसतो. नुकताच याचा प्रत्यय आला असून फेसबुकच्या एका पोस्टमुळे एका कर्करोग झालेल्या रुग्णाला २५ लाखांची मदत मिळाली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवरुन गुजरातमधील कर्करोग झालेल्या मुलाबाबत पोस्ट शेअर करण्यात आली होती. सोशल मीडियावर अशाप्रकारच्या पोस्ट आल्यावर साहाजिकच रुग्णाला सहानुभूती दाखवली जाते. एखादेवेळी मदतीचा हातही पुढे येतो. मात्र मूळचा गुजरातचा असणाऱ्या ऋषी नावाच्या तरुणाला कर्करोगावरील उपचारांसाठी नेटवरुन थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २५ लाखांची मदत मिळाली आहे, तीही अवघ्या १५ तासांत.

कर्करोगाच्या उपचारांसाठी जास्त प्रमाणात पैसे लागतात. ऋषीच्या कुटुंबाकडे त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्याच्या वडिलांना महिना १५ हजार वेतन मिळते. त्यातूनही त्यांनी ऋषीच्या उच्चशिक्षणासाठी १३ लाख रुपये वाचवले. एमबीए करुन चांगली नोकरी करायचे त्याचे स्वप्न होते. पण अचानक कर्करोग उद्भवल्याने हे सगळे पैसे उपचारात खर्च झाले. मात्र इंटरनेटवरील एका आवाहनातून त्याला मिळालेली रक्कम त्याच्या उपचारांसाठी वापरली जाणार आहे. त्याला दुर्मीळ प्रकारचा कर्करोग झाला असून त्याच्यावर किमोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे उपचार करावे लागणार आहेत.

अचानक झालेल्या आजाराचा सामना करताना तसेच किमोथेरपी दरम्यानही मी स्वतःला खंबीर ठेऊ शकतो. पण माझ्या वडिलांना चिंतेत पाहणे मला सहन होत नाही. मुलगा म्हणून मी त्यांची स्वप्ने पूर्ण करत नाही याचेही मला दु:ख वाटते असे त्याने आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.