भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक वादात सापडलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘पद्मवात’ असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सुरु झालेल्या वादाचं शुक्लकाष्ठ चित्रपट प्रदर्शित होऊनही संपलं नाही. देशभरात या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद, जाळपोळ, तोडफोडीचं सत्र अद्यापही कायम आहे. चित्रपटाच्या नावात बदल, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा राज्यानं चित्रपट प्रदर्शनावर घातलेली बंदी, सेन्सॉरचा कचाटा, करणी सेनाचा आक्षेप यामुळे या चित्रपटावर असणारे वादाचे मोहोळ गेल्यावर्षभारापासून संपले नाही.

हा चित्रपट गुरूवारी प्रदर्शित झाल्यापासून विविध ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. गुरगावमधील शालेय बसवरही करणी सेनेनं दगडफेक केली. करणी सेना आणि त्यांच्यासारख्या इतर संघटनांचा या चित्रपटाला असणारा विरोध कायम आहे तर दुसरीकडे हा चित्रपट पाहण्यास उत्सुक असलेले प्रेक्षक मात्र या चित्रपटावर घेण्यात आलेल्या आक्षेपावर नाराज आहे. अनेक मल्टिपेक्सनां सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तरीही अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी जात आहे. पण त्यातच काही चित्रपटगृहांनी तिकिटीचे दर दुप्पटीनं वाढवले त्यामुळे प्रेक्षकांना १ हजारांपासून ते अडीच हजारांपर्यंत एका तिकिटीसाठी मोजावे लागत आहेत. अशी परिस्थिती देशभर असताना ट्विटरवर मात्र ट्विपल्सची वेगळीच चर्चा सुरू आहे. एकीकडे या चित्रपटाला जसा विरोध केला आहे तसा विरोध तिकीट वाढीविरोधातदेखील करावा अशी मागणी मस्करीत ट्विपल्सकडून होताना दिसत आहे.

करणी सेनेच्या विरोधात ट्विटरवर एकापेक्षा एक विनोदांचा पाऊस सुरू आहे. इतकंच कशाला काहींनी तर आपल्या मित्रांवर वचपा काढण्यासाठी करणी सेनेला त्यांचे पत्ते देण्यास सुरूवात केली. त्यामुळे एककीडे ‘पद्मावत’वरून देशभरात वाद तर दुसरीकडे ट्विटरवर मात्र ‘विनोदाचं वादळ’ असा विरोधाभास सुरू आहे. त्यामुळे थोडक्यात काय तर ‘पद्मावत’वरून सुरू असलेल्या वाद विवादाच्या बातम्या ऐकून वाचून तुम्ही कंटाळला असाल तर ट्विटरवरचे हे भन्नाट जोक्स नक्की वाचा! तेवढं चेहऱ्यारवर हसू उमटेल हे नक्की.