पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो यांनी समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन महिलांचे प्राण वाचवले आहेत. ७२ वर्षीय मार्सेलो यांनी प्रसंगावधान दाखवत कायाक (बोट) पलटी झाल्यानंतर दोन महिलांचे प्राण वाचवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर मार्सेलो यांचे कौतुक होताना दिसत आहे.

पोर्तुगालमधील अर्गारेव्ह समुद्रकिनाऱ्यावर कायाकिंग करत असणाऱ्या दोन महिलांची बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर उलटली. या दोन्ही महिला आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत बोटीला धरुन मदतीसाठी धडपड करत होत्या. समुद्रकिनाऱ्यावर हा प्रकार घडत असतानाच राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दी सोऊसा हे समुद्रकिनाऱ्यावर एका चित्रिकरणासाठी आले होते. पर्यटनाला चालना मिळावी यासंदर्भातील प्रसिद्धिसाठी सध्या मार्सेलो हे देशातील महत्वाच्या पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. याच भेटीचा भाग म्हणून ते अर्गोरेव्ह समुद्रकिनाऱ्यावर आले होते. प्रसारमाध्यमांशी चर्चा करुन झाल्यानंतर ते समुद्रकिनाऱ्यावर जात असतानाच त्यांना दोन महिला बुडत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने या महिलांची मदत करण्यासाठी समुद्राच्या दिशेने धाव घेतली. राष्ट्राध्यक्षांनीच तातडीने समुद्रकिनाऱ्यावर धाव घेतल्याने अचानक यंत्रणा सतर्क झाली.

नक्की पाहा >> Video: …म्हणून शेतकऱ्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गायीला केलं एअरलिफ्ट

मार्सेलो हे महिलांजवळ पोहचले आणि त्यांना बोटीला धरुन राहण्यास सांगत होते. राष्ट्राध्यक्षच मदतीसाठी पुढे सरसावल्याने समुद्रकिनाऱ्यावरील एक स्पीडबोट त्यांच्या मदतीला आली. या दोन्ही महिलांना स्पीडबोटवर बसवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुन्हा किनाऱ्यावर परतले. तोपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर जमलेल्यांनी टाळ्या वाजवून राष्ट्राध्यक्षांचे कौतुक केलं.

घडलेल्या घटनेबद्दल स्थानिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या मार्सेलो यांनी या दोन्ही महिला दुसऱ्या एका समुद्रकिनाऱ्यावरुन येथे आल्याचे सांगितले. पाण्याच्या प्रवाहामुळे त्या इतरपर्यंत आल्या आणि समुद्रकिनाऱ्यावर येण्याआधीच त्यांची बोट पलटल्याचे राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं.

नक्की पाहा >> बापरे… अमेरिकेत आलं आगीचं वादळ; व्हिडिओ झाला व्हायरल

संपूर्ण घटनाक्रमानंतर मार्सेलो हे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना मास्क घालण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन करण्याचं आवाहन करताना दिसले. यावेळेस राष्ट्राध्यक्षांनी स्वत:ही मास्क घातल्याचं दिसून आलं. हेच व्हिडिओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.