सोशल मीडियावर आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीपर्यंत अवघ्या 30 मिनिटांमध्ये पोहोचून त्याचं मतपरिवर्तन आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्याची कामगिरी पुणे पोलिसांनी केली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रकाश गोरे या 30 वर्षीय हडपसरचा रहिवासी असलेल्या व्यक्तीने एका लोकप्रिय सोशल मीडिया अॅपवरील एका ग्रुपवर आत्महत्या करण्यासंदर्भात पोस्ट केली होती. शनिवारी दुपारी सोशल मीडियावर गोरे यांनी आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकली. त्याची ही पोस्ट ग्रुप अॅडमीनने वाचली आणि त्याने तातडीने याबाबत राज्य सायबर विभागाकडे माहिती दिली.

राज्य सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी हडपसरच्या सायबर सेलला घटनेची माहिती देऊन सूचना दिल्या. त्या व्यक्तीचा शोध घेत असताना ती व्यक्ती हडपसरमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यास सांगितले. हडपसर पोलिसांनी आत्महत्येची आगाऊ सूचना देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती व्यक्ती कोणाचाही फोन उचलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीचे परिवर्तन केले. त्यांनंतर त्यांना हडपसर पोलिस ठाण्यात आणून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त समीर शेख आणि जाधव यांनी समुपदेशन केले व त्या व्यक्तीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. आत्महत्येचा प्रयत्न करणारे गोरे हे मूळ उस्मानाबादचे असून त्यांचं लग्न झालं आहे. तसंच ते स्पर्धा परीक्षांची तयारीही करत आहेत. त्यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून वेगवान कारवाई करत एका व्यक्तीचा जीव वाचवून त्याला आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.