सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकाडाउन सुरु आहे. पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. दरम्यान या काळात सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे भारतीय खेळाडू आपल्या घरात परिवारासोबत राहत आहेत. अष्टपैलू रविंद्र जाडेजाने घराबाहेर येत आपल्या खास तलवारबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. रविंद्र जाडेजाचं मैदानात चांगली फलंदाजी केल्यानंतर आपल्या बॅटच्या सहाय्याने होणारं सेलिब्रेशनही चांगलंच प्रसिद्ध आहे.

रविंद्र जाडेजाच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली. मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने जाडेजाच्या या व्हिडीओवर, मित्रा तुझ्या बागेतलं गवत वाढंयय ते आधी काप अशी मिश्कील कमेंट केली. ज्याला जाडेजानेही लगेचच उत्तर दिलं.

करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता सध्याच्या घडीला आयपीएल होणं शक्य नसल्याचं दिसतंय. जाडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करतो.