‘देखो चांद आया’ म्हणत मुंबईची राणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्यावेळी ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का?’ आणि झिंगाटच्या धर्तीवर ‘मुंबई गेली खड्ड्यात’ असं गाणं तयार करून तिने पालिकेवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा आरजे मलिष्का आपल्या एका नव्या गाण्यासह मुंबई महानरपालिकेवर टीका करताना दिसत आहे. मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर तिने ‘चांद जमिन पर’ असं गाणं तयार केलं आहे. सध्या हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ते नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे.

मुंबईतील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. अनेक चित्रपट कलाकारांनीही यावरील व्हिडीओ शेअर करत वाचा फोडली. त्यातच आता आरजे मलिष्कानेही एक व्हिडीओ शेअर करत ही समस्या मांडली आहे. मलिष्काने आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरू ‘चांद जमीन पर’ या नावाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आपण चंद्रावर पोहोचलो आहोत. तसाच चंद्रही आपल्यापर्यंत पोहोचला आहे. आपलं आणि मुंबईतील खड्ड्यांचं सात जन्माचं नातं आहे आणि ते नातं जपताना यावर्षीचं व्रत तोडत असल्याचं तिनं म्हटलं आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांसोबत तिने हे गाणं चित्रीत केलं आहे. करवा चौथचा व्रत सोडताना चाळणीतून चंद्राला पाहून उपवास सोडतात, तसं मलिष्का चाळणीतून खड्ड्यांना पाहताना दिसत आहे. तर कधी खड्ड्यात कोणी पडल्यावर ‘तुम आए तो आया मुझे याद’ असं म्हणताना दिसत आहे. तर कधी त्या खड्ड्यांसोबत चहाचा आनंद घेताना दिसत आहे.

यापूर्वीही मलिष्काने उपहासात्मक गाण्यातून मुंबई महानगरपालिकेवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्याही काही नेत्यांनी गाणी तयार करत मलिष्काला घेरण्याचा प्रयत्न केला होचा. तसंच त्यानंतर पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी तिच्या घरी तपासणी केल्यानंतर डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचे म्हटले होते. आता या नव्या गाण्यानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे.