न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी बाजी मारत भारताने मालिकेत ५-० असा दिमाखदार विजय मिळवला. न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र या विजयानंतरही टीम इंडियाच्या मधल्या फळीतला अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी ठरतो आहे.

भारतीय गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. अवघ्या १७ धावांत न्यूझीलंडचे आघाडीचे ३ फलंदाज माघारी परतले होते. मात्र यानंतर टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत, भारतीय गोटात चिंतेचं वातावरण तयार केलं. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर तर दोन्ही फलंदाजांनी ३४ धावा कुटल्या. शिवम दुबेने टाकलेल्या महागड्या षटकाचं पृथक्करण काहीसं असं होतं…

पहिला चेंडू – षटकार, दुसरा चेंडू – षटकार, तिसरा चेंडू – चौकार, चौथा चेंडू – एक धाव, पाचवा चेंडू – नो-बॉलवर चौकार, पाचवा चेंडू – षटकार, सहावा चेंडू – षटकार

यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट प्रेमींनी शिवम दुबेला चांगलंच ट्रोल केलं आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता शिवम दुबेचं नाव दुसऱ्या स्थानावर आलेलं आहे. स्टुअर्ट ब्रॉडने २००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषकात एका षटकात ३६ धावा दिल्या होत्या. दरम्यान, टी-२० मालिकेचं आव्हान संपल्यानंतर भारतीय संघ वन-डे मालिकेसाठी सज्ज होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारत ३ वन-डे आणि त्यानंतर २ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.