तुम्हाला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट आठवतो. त्यात संजय दत्त रुग्णांना ‘जादू की झप्पी’ देऊन त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यात रुग्णाची भूमिका निभावणाऱ्या जिमी शेरगिलनं रागानं त्याच्या कानशिलातही भडकावल्याचं आठवत असेल. पण तरीही ‘मुन्नाभाई’ शांतपणे त्याला जादू की झप्पी देतो आणि त्यामुळं जिमीचा राग शांत होतो. ती झाली पडद्यावरील घटना. पण वास्तवात अशीच एक घटना घडली आहे. एका पोलिसानं दिलेल्या जादूच्या झप्पीनं एका चोराचं मन जिंकलं आहे. ते कसं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा!

समस्या कोणतीही असो ती तावातावाने, रागात किंवा आरडाओरडा करून सुटत नाही. याचा अनुभव आपल्याला अनेकदा आलाच असेल. काही अडचणींवर शांत राहूनही मार्ग काढता येतो. काही प्रश्न शांततेच्या मार्गानेच सुटतात. समोरील व्यक्ती रागात असल्यावर त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा प्रेमाने तो वाद मिटवता येतो किंवा त्याचा राग शांत करता येतो. सोशल मीडियावर बँकॉक पोलीस ठाण्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला त्याचीच प्रचिती येईल. पोलीस स्टेशनमधील पोलिसावर एका चोराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. तरीही तो पोलीस शांत बसून राहिला. चाकूचा धाक दाखवून आक्रमक झालेल्या चोराशी शांतपणे बोलून त्याच्या हातातला चाकू फेकून देण्यास पोलिसानं त्याला भाग पाडलं. त्यानंतर जादू की झप्पी देत म्हणजे अलिंगन देत चोराचा विश्वास संपादन करण्यात तो यशस्वी झाला. पोलिसाच्या या प्रेमानं चोरालाही अश्रू अनावर झाले. हा पोलीस आधी गायक होता, असंही समजत आहे. राग व्यक्त करून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत, तर शांतपणे बोललं तर कोणताही परिस्थिती आपण हाताळू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले.