भारतीय क्रिकेट संघाला 2011 चा विश्वचषक व 2007 साली पहिला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती स्वीकारली. क्रिकेटची कारकीर्द आज संपुष्टात आली, हे सांगताना युवराज भावुक झाला होता. कर्करोगासारख्या आजारावर मात करत मैदानात परतलेला युवराज सिंग मागील बराच कालावधी टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याच्या निवृत्तीनंतर संपूर्ण क्रिकेटविश्वातून युवराजला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा सुरू झाल्या आहेत. निवृत्ती जाहीर करताच सोशल मीडियावरही युवराज सिंग ट्रेंड झाला आणि युजर्सकडून युवराजने भारतीय क्रिकेटला दिलेल्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यास सुरूवात केली. नेटकऱ्यांनी युवराजवर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण त्याचसोबत अनेकांनी युवराजच्या निवृत्तीवर दुःखही व्यक्त केलं आणि सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात युवी नसल्याची खंतही बोलून दाखवली. पण असं असलं तरीही प्रत्येकाकडून (सामान्य नेटकरी किंवा आजी-माजी क्रिकेटपटू) एक प्रतिक्रिया मात्र आवर्जुन पहायला मिळाली आणि ती म्हणजे…’थँक यू युवराज…संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे’. एक नजर मारुया सोशल मीडियातील काही प्रतिक्रियांवर –

मी जर पुन्हा शाळेत गेलो तर ‘सर्वाधिक कौतुक वाटणारी व्यक्ती’ अशा आशयाचा निबंध मी युवराजवर लिहेन. तो प्रेरणादायी आणि लढवय्या आहे.

दैदिप्यमान कारकिर्दीच्या शुभेच्छा, तू सर्वांसाठी प्रेरणादायी आहेस. तुझ्यासोबत खेळल्याचा परिपूर्ण आनंद लुटला. तू दिलेल्या आठवणींसाठी आभार..तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा..क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने हे ट्विट केलं आहे.

एखादी गोष्ट घडल्याशिवाय तिचा तुमच्या मनावर काय परिणाम होईल हे कळत नसतं. युवीची निवृत्ती अशीच आहे. तो पुन्हा खेळणार नाही हा विचार करुनच मला दुःख होतंय… तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

केवळ तुझ्यामुळेच भारत 2011 आणि टी-20 चा विश्वचषक जिंकू शकला. तुला खेळताना पहायला नेहमीच मजा आली,  तुला समोर पाहून गोलंदाज घाबरायचे. तू स्टुअर्ट ब्रॉडच्या करिअरचं वाटोळं केलंस. तुझ्यासारख्या डावखुऱ्या फलंदाजाला भारत कधीही विसरणार नाही.

तुझ्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आज स्टुअर्ट ब्रॉड नक्कीच आनंदी असेल.