मुंबई देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांपैकी एक. कधीही न झोपणारे हे शहर खरोखरच घड्याळाच्या काट्यावर धावत असते. या शहराची लाइफलाइन आहे मुंबईची लोकल ट्रेन. रोज लाखोंच्या संख्येने मुंबईकर या लोकल ट्रेनने प्रवास करता. मुंबईकर असल्यास लोकलमधली गर्दी गर्दी वाटत नाही पण खरोखरच मुंबईमध्ये रोज वेगवेगळ्या कामांसाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे दिवसोंदिवस ही गर्दी वाढताना दिसत आहे. मात्र मुंबईतील गर्दी हा काही आजचा प्रश्न नाहीय हेच दाखवणार एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये १९७० च्या दशकात मुंबईकर कशाप्रकारे लोकल ट्रेनला लटकून प्रवास करायचे ते दिसत आहे.

ट्विटवरील इंडिया हिस्ट्री पिक्स या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आलेल्या फोटोवरुन सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा रंगली आहे. या ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोमध्ये अनेकजण लोकल ट्रेनच्या डब्ब्याच्या दारावर तसेच खिडक्यांवर लटकत प्रवास करत असल्याचे दिसत आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या या ट्रेनमध्ये शिरण्यासाठी जागा नसल्याने अनेकजण या ट्रेनच्या डब्याच्या दारात तसेच अगदी खिडक्यांवरही चढून उभे असल्याचे दिसत आहेत. हा फोटो १९७० च्या दशकातील असल्याचे ‘इंडिया हिस्ट्री पिक्स’ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘गर्दीच्या वेळी बॉम्बेमधील लोकल ट्रेनने प्रवास करणारे प्रवाशी’ अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

या फोटोवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया देत वर्ष बदलले तरी परिस्थिती ‘जैसे थे’च आहे असं म्हटलं आहे. अनेकांनी मुंबईच्या लोकल ट्रेनच्या प्रवासात काहीच फरक पडलेला नसल्याचे या ट्विटला रिप्लाय करुन म्हटले आहे. पाहुयात काय आहे वाचकांचे म्हणणे.

नेहरु असो वा मोदी मुंबईकरांच्या नशिबी लटकणेच

काहीच बदल नाही

आजही असचं

तेव्हा आणि आता काही विशेष बदल नाही

विश्वास सुतरकर यांनी हा इतिहास नसून वर्तमानकाळ असल्याचे म्हटले आहे.

जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीचा हा फोटो आणि आज मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दिसणारी गर्दी यात काहीच विशेष फरक पडल्याचे दिसत नाही. रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असली तरी त्यापेक्षा अनेक पटींनी प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच मागील अर्ध्या शतकामध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे नेटकरी म्हणाले आहेत.