मानवाला पहिल्यापासूनच थराराचे आकर्षण राहिले आहे. काहींना थरारक कृत्ये करण्यात आनंद मिळतो, तर थरारक दृश्यांचा व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्यादेखील खूप आहे. सेल्फी प्रकाराच्या आगमनाने तर यात दिवसागणीक वाढच होताना दिसते. अनेकवेळा अनेकजण सेल्फीच्या नादात गुंगलेले पाहायला मिळतात. खास करून पर्यटनच्या ठिकाणी, हॉटेलमध्ये, सेलिब्रिटींसोबत, ऐतिहासिक स्थळी, समुद्रकिनारी आणि अगदी सहज नजर मारल्यास सार्वजनिक ठिकाणासह इतरत्रदेखील असे सेल्फी बहाद्दर आढळून येतात. सेल्फीचा हा नाद जोपर्यंत थरारक वळण घेत नाही, तोपर्यंत सर्वकाही ठिक असते. परंतु, जीवावर बेतणारा परफेक्ट सेल्फी आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या नादात अनेकांनी प्राण गमावले आहेत. सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकण्याची जणू काही स्पर्धाच लागल्याचे भासते. काहीजण तर सर्व सीमा ओलांडून इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे दर्शविण्याचा प्रयत्न करतात. यात मुलीदेखील मागे नाहीत. अशाच एका तरुणीने गगनचुंबी थराराचा कारनामा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
‘मी हे केलं आहे यावर अजूनसुद्धा माझा विश्वास बसत नाही. प्रत्येकवेळी हा व्हिडिओ पाहताना माझ्या हातांना घाम येतो.’, व्हिक्टोरिआ ओदिनोत्स्वा नावाच्या मॉडेलने हा असा संदेश तिच्या एका पोस्टमध्ये लिहिला आहे. या व्हिक्टोरिआने केलेला कारनामा पाहून तुम्ही थक्क व्हाल. एका गगनचुंबी इमारतीवरील तिचा हा थरारक व्हिडिओ आणि फोटोशूट पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिक्टोरिआचा जन्म सेंट पिटर्सबर्गमध्ये झाला असून, इंस्टाग्रामवरील तिच्या खात्यावर सतत ती अशा धाडसी पोस्ट टाकत असते. उत्तुंग इमारतीवर लटकतानाचा तिचा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकला नाही तर नवलच. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर अनेक जणांनी पाहिला असला तरी तिचा निष्काळजीपणा आणि धोकादायक स्टंटचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध केला आहे. आपल्या अशा वागण्यातून तिला तरुणांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न बऱ्याच जणांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे तिने जे काही केले ते धाडसी आणि कलात्मक असल्याचा रागदेखील काहीनी आळवला आहे.
