जंगलामध्ये अनेक अद्भूत गोष्टी घडत असतात. येथे जिवंत राहण्यासाठी रोज मृत्यूशी झुंज द्यावी लागते. तर कधी या जंगली प्राण्यांच्या थक्क करणाऱ्या कसरती आपल्याला आश्चर्यचकित करतात. कधीतरी जंगलामधील हा थरार कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याची चर्चा होते. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

बीबीसीच्या ‘प्लॅनेट अर्थ’ कार्यक्रमाअंतर्गत शूट करण्यात आलेला ४६ सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मांजर प्रजातीमधील बॉबकॅट यामध्ये दिसते. अमेरिकेमध्ये अढळणाऱ्या या मांजरी जंगलामध्ये राहतात. आकाराने सामान्य मांजरींपेक्षा थोड्या मोठ्या आणि गुबगुबीत असणाऱ्या मांजरी खूपच चपळ असतात. बिबट्याप्रमाणे या मांजरींच्या अंगावर काळ्या आणि पिवळ्या रंगाचे चट्टेपट्टे असतात. मात्र ती बिबट्या इतक्या जलद वेगाने पळू शकत नाही. तरी या मांजरींमधील लवचिकता खूप जास्त असते. अनेकदा त्या शिकार करण्यासाठी याचा वापर करतात.

बॉबकॅट या व्हायरल व्हिडिओमध्ये एका उडीमध्ये नदी ओलांडताना दिसत आहे. नदीच्या एका तिरावरील दगडावरुन उडी मारून ही मांजर थेट दुसऱ्या तिराजवळील दगडावर उतरताना दिसते. ‘नेचर इज लीट’ नावाच्या ट्विटर हॅण्डलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला मागील दोन दिवसांमध्ये अडीच लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. अनेकांनी कमेंट करुन या उडीबद्दल आश्चर्यही व्यक्त केले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होत असला तरी तो नक्की कुठे शूट करण्यात आला आहे याबद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.