मेंदू विकासाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते, थांबत नाही. म्हणूनच शिकायला वयाचं बंधन नाही असं म्हणतात. हेच एका १०८ वर्षांच्या आज्जीबाईंनी खरं ठरवलं आहे. तमिळनाडूतील १०८ वर्षांच्या आजी केरळ राज्याद्वारे चालवल्या जाणार्‍या साक्षरता कार्यक्रमात पहिल्या आल्या आहेत. यामुळे सर्वत्रच आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तमिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील कुंबम येथे १९१५ मध्ये जन्मलेल्या कमलाकन्नी या फक्त दुसरीपर्यंत शकल्या होत्या. त्यानंतर परस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. मात्र कुठेतरी अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. म्हणूनच वयाच्या १०८ व्या वर्षी कमलाकन्नी या आज्जींनी पुन्हा नव्यानं सुरुवात करुन यश गाठलं.

शिकायला वयाचं बंधन नाही –

केरळ सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन फॉर ऑल अँड ऑलवेज’ या टॅगलाइनसह एक योजना सुरू केली आहे. कमलाकन्नी यांचे शिक्षणाप्रती असलेले समर्पण या उतरत्या वयातही कायम आहे.कमलाकन्नी आता 108 वर्षांच्या आहेत, तरीही त्या शारीरिकदृष्ट्या ठणठणीत आहेत. त्यांना नीट दिसतं व ऐकूही येतं. केरळमधील संपूर्ण शास्त्र साक्षरता कार्यक्रमांतर्गत, वृद्ध लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूमधील ‘अरिवोली इयक्कम’ म्हणजेच जनसाक्षरता चळवळीप्रमाणे वृद्ध लोकांनी ‘साइन देअर नेम्स’ या आधारावर शिक्षण दिले जात आहे. या १०८ वर्षीय आजीने केरळच्या साक्षरता कार्यक्रमात प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी तमिळ आणि मल्याळम या दोन्ही भाषांमध्ये लेखनाचा सराव केला आणि साक्षरता प्रकल्पाच्या परीक्षेत त्यांनी १०० पैकी ९७ गुण मिळवले आहेत. केरळच्या अनेक संस्था त्यांचं वय पाहता या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल कृतज्ञ आहेत.

हेही वाचा – पुत्र व्हावा ऐसा…! पायलट बनून मुलानं गावचं पांग फेडलं, बापानं थेट हेलिकॉप्टरमधून केली पृष्पवृष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढच्या महिन्यात साजरा करणार 109वा वाढदिवस –

पुढच्या महिन्यात आजीच्या 109व्या वाढदिवसाला तिचा सन्मान करण्याचा विचार आहे, असं त्यांच्या नातवानं सांगितलं आहे. तसंच आमच्या आजीने चांगले गुण मिळवून एक आदर्श ठेवला याचा आम्हाला आनंद आहे अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार, केरळ हे भारतातील सर्वांत साक्षर राज्य आहे, ज्याचा साक्षरता दर ९६.०२ टक्के आहे.