मराठी वाचवा, असा उद्घोष सर्वच स्तरातून होत असला तरी मराठी माणूस मात्र आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी पोटाला चिमटा काढून आपला पाल्य इंग्रजी शाळेत शिकावा याकडे पालकांचा कल असतो. पण सिंधुदुर्गात मात्र याच्या उलट झालंय. इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क एक रशियन मुलगा रमलाय. नुसता रमला नाही तर त्याने शाळेत काही दिवसांसाठी प्रवेश घेऊन मराठीमध्ये अभ्यासाला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आजगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गावातील मुलांसोबत मिरॉन अभ्यास करतोय. अवघ्या काही दिवसांत मिरॉनने मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला असून तोडकंमोडकं बोलून तो शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देतो. सोशल मीडियावर सगळीकडेच मिरॉनचे फोटो आणि त्याची माहिती आता व्हायरल देखील झाली आहे.

डायना लुकेशिवी, तिचा पती आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा मिरॉन भारतात सहा महिन्यांच्या पर्यटनासाठी आले आहेत. सिंधुदुर्गात फिरत असताना मिरॉन आणि त्याच्या पालकांना आजगावची जिल्हा प्राथमिक शाळा नजरेस पडली आणि मिरॉन झेडपी शाळेच्या प्रेमात पडला. आज शहरी मराठी माणूस झेडपीकडे पाठ फिरवत असला तरी रशियाच्या मिरॉनला झेडपी शाळा आवडली, हे विशेष. महिनाभरापासून मिरॉन या शाळेत शिकत आहे. इथल्या मुलांबरोबर तो मराठीमध्ये शिक्षण घेतो आहे. शाळेने त्याला गणवेश देखील दिला आहे. वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये, कवायती आणि सकाळच्या प्रार्थनेतही मिरॉन भाग घेतो.

या शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, “मिरॉनचे आई वडील गोव्यातून सिंधुदुर्गात फिरण्यासाठी आले होते. यावेळी त्यांची नजर आमच्या शाळेवर पडली. आमची शाळा अतिशय स्वच्छ आणि रंगरंगोटी केलेली आहे. त्यामुळे लोकांची शाळेवर सहज नजर पडते. मिरॉनचे पर्यटनामुळे शिक्षण वाया जाऊ नये म्हणून त्याच्या आई-वडीलांनी आमच्या शाळेत प्रवेश मागितला. आम्हीही विशेष बाब म्हणून मिरॉनला शाळेत दाखल करुन घेतले आहे. त्याची नोंद अधिकृत केलेली नाही. आज मिरॉन सर्व मुलांबरोबर समरस झाला आहे. सुरुवातील त्याच्यासोबत इंग्रजीमध्ये संभाषण केले जात होते. आता मात्र त्याला मराठी कळते. मराठी मुळाक्षरे देखील त्याने गिरवायला सुरुवात केली आहे. मिरॉनमुळे इतर मराठी मुलांमध्ये इंग्रजी शिकण्याचा हुरुप वाढला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरॉनची आई डायना लुकेशिवी यांनी सांगितले की, रशियामध्ये ७ वर्ष वय झाल्यानंतरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो. तसेच आमच्याकडे शाळेचा वेळ देखील कमी आहे. याउलट भारतात सहा वर्षाचे वय असताना मुलांना प्रवेश दिला जातो. तसेच शाळेचा वेळ अधिक आहे. त्यामुळे मिरॉनला ही शाळा खूप आवडली. येथे तो मुलांबरोबर खेळतो, अभ्यास करतो. तर मिरॉन लुकेशिवी म्हणाला की, मला इथे खूपच मजा येत आहे. माझे मित्र झाले आहेत. त्यांच्यासोबत मी खेळतो. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. हे सांगत असताना त्याने पाणी, आई-बाबा, पपई, अननस असे शब्द सांगत धन्यवाद म्हटले. त्याची ही मुलाखत एबीपी माझा वाहिनीवर आहे.