Marriage immigration scam: सोशल मीडियावर सध्या एक असं प्रकरण व्हायरल होत आहे की तुम्ही म्हणाल हे खरंच घडलं की एखाद्या चित्रपटाची स्टोरी आहे. हे प्रकरण ऐकल्यानंतर कोणी म्हणत आहे की कोण होणार पती क्रमांक १६… तर कोणी म्हणत आहे की हे खरंच आहे की चित्रपटातली स्टोरी.
काय आहे हे प्रकरण?
पंजाबमधील आलमपूर गावातील रहिवासी भिंदर सिंह यांना त्यांच्या पत्नीसोबत इंग्लंडमध्ये राहायचं होतं. त्यांची पत्नी आधीपासूनच इंग्लंडमध्ये राहत होती आणि तिने पती आणि मुलासाठी स्पॉन्सरशिप पाठवली होती. भिंदर सिंह यांनी एका इमिग्रेशन कंपनीच्या मदतीने व्हिसासाठी अर्ज केला. मात्र, काही दिवसांनंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांचा व्हिसा बनू शकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं. एवढंच नाही तर, इंग्लंडमध्ये त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आल्याचेही त्यांना सांगण्यात आले. भिंदर सिंह यांच्या पत्नीने तब्बल १५ पुरूषांना तिचा पती असल्याचे सांगत व्हिसा मिळवून दिला होता आणि त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती.
भिंदर सिंह यांना हे कळल्यावर कोणीतरी आपली मस्करी तर करत नाही ना असा संशय त्यांना आला. मात्र, त्यांच्या पत्नीला अटक केल्याची बातमी त्यांना समजली तेव्हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. ज्या कागदपत्रांचा वापर भिंदर सिंह आणि त्यांच्या पत्नीने व्हिसा मिळवण्यासाठी केला, त्याच कागदपत्रांचा गैरवापर १५ तरूणांना व्हिसा मिळवून देत इंग्लंडला पाठवलं गेलं होतं. या १५ जणांना भिंदर सिंह यांच्या पत्नीचे पती सांगत व्हिसा मिळवून दिला होता.
या संपूर्ण फसवणुकीमागे एक इमिग्रेशन कंपनी आहे, ज्यांनी भिंदर सिंह आणि त्यांच्या पत्नीच्या कागदपत्रांचा गैरवापर करत १५ तरूणांना इंग्लंमध्ये पाठवले होते. हे समोर आल्यानंतर भिंदर सिंह यांनी राजपुरा इथे पोलीस तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्स आणी मीम्सची लाट उसळली. लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.
एका युजरने म्हटले की, १५ पती? हिच्याकडे तर क्रिकेट टीम बनवण्यासाठी पूर्ण स्क्वॉड आहे. आणखी एका युजरने म्हटले की, अजून एक गर्लफ्रेंड नाही आणि इथे १५ पती? दुसऱ्या एका युजरने म्हटले की, हा एखाद्या सिरियलचा प्लॉट वाटत आहे. तर एका युजरने म्हटले की, या महिलेची अटक चुकीची आहे, खरा आरोपी तर इमिग्रेशन एजंट आहे आणि त्याचीच चौकशी केली पाहिजे.