गेल्या दीड महिन्यांपासून कोणत्याही मदतीवाचून तो समुद्रात अडकून होता. ‘त्यावेळी माझ्या बाजूनं जवळपास दहाहून अधिक जहाजं गेली. मी प्रत्येकवेळी मदतीसाठी ओरडायचो पण एकही जहाज मला मदत करण्यासाठी थांबलं नाही. मी जगण्याची आशा तेव्हा सोडून दिली.’ मन हेलावून टाकणारे अनुभव १९ वर्षांचा अल्दी अदीलांग सांगत होता. तब्बल ४९ दिवसानंतर या मुलाची समुद्रातून सुटका करण्यात आली. सुदैवानं तो सुखरूप होता.

मुळचा इंडोनेशियाचा असलेला अल्दी पोटापाण्यासाठी मासेमारीचं काम करतो. झोपडीसारखी दिसणारी एक लहानशी बोट खोल समुद्रात जिथे मासेमारी चालते तिथे उभी करण्यात येते. या बोटीवर सहा महिने राहण्याचं काम त्याचं होतं. या बोटीवर विशिष्ट प्रकारची प्रकाशयोजना केली होती. रात्रीच्या वेळी या प्रकाशयोजनेचा वापर करून माशांना जाळ्यापाशी आणण्याची जबाबदारी अल्दीवर होती. दर आठवड्याला एक बोट खाण्यापिण्याचं आणि इतर आवश्यक साहित्य अल्दीला पुरवरून परत निघून जायची.

मात्र जुलै महिन्यात आलेल्या वादळानं त्याचा सगळ्यांशीच संपर्क तुटला. अल्दीची झोपडीरुपी बोट समुद्रात भरकटत गेली. १९ वर्षांच्या अल्दीचे सर्व मार्ग बंद झाले. यापूर्वीही असे अनेक मच्छिमार अन्न पाण्यावाचून समुद्रात भरकटले होते मात्र त्यांच्या तुलनेत वयानं अल्दी खूपच लहान होता. म्हणूनच ४९ दिवस ज्या जिद्दीनं त्यानं संकटाला तोंड दिलं त्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

‘समुद्रातलं खांर पाणी गाळून ते मी प्यायचो तर मासे खाऊन मी पोट भरलं. कोणीतरी येऊन मला वाचवावं ही प्रार्थना मी रोज करायचो. माझ्या आजूबाजूनं कितीतरी जहाजं गेली पण एकही मदतीसाठी थांबलं नाही. एक क्षण समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात आला होता पण त्यावेळी आई- वडिलांचा विचार मनात आला. त्यांच्यासाठी मला जगलंच पाहिजे त्यामुळे केवळ वाट पाहण्यावाचून माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता’ असे अनेक अनुभव त्याने सांगितले, अखेर तब्बल ४९ दिवसांनी त्याला मदत मिळाली. जपानच्या कोस्ट गार्डनं सुरक्षित त्याला वाचवलं गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. नुकताच तो आपल्या घरी परतला आहे.