सोशल नेटवर्कींगवर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या भारतीयांपैकी एक नाव म्हणजे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा. फोटोंना कॅप्शन देण्याचे आवाहन करण्यापासून ते क्रिकेटच्या समान्यांबद्दल आणि व्हॉट्सअपवरील मेसेजपासून ते मदतची घोषणा करण्यापर्यंत अनेक गोष्टी आनंद महिंद्रा ट्विटरवरुन करतात. अनेकदा त्यांनी मांडलेल्या मतांवरुन सोशल नेटवर्किंगवर चर्चा रंगताना दिसते. तर कधी त्यांनी पोस्ट केलेलं एखादं ट्विट प्रचंड व्हायरल होतं. रविवारी सायंकाळी महिंद्रा यांनी असाच एक व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओत महाबळेश्वरजवळच्या पाचगणीमध्ये रस्त्यावर दोन वाघ दिसल्याचा दावा करण्यात आलाय. आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ एक मजेशीर कॅप्शन देत शेअर केलाय. मात्र हा व्हिडीओ ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील जुना व्हिडीओ असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

“तर हायवेवर केवळ आमची एक्सयूव्ही ही एकमेव बिग कॅट नाहीय. भन्नाट आहे हे…” अशा कॅप्शनसहीत आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये हे वाघ १९ ऑगस्ट २०२१ रोजी पाचगणीजवळच्या मार्गावर रात्रीच्या वेळी दिसल्याचं सांगण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये आधी एक वाघ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून बाहेर रस्त्यावर येतो. त्यानंतर तो दुसऱ्या बाजूला उभ्या असणाऱ्या बाईकपर्यंत येऊन पुन्हा जिथून तो बाहेर आलेला त्या दिशेने जातो. त्या दरम्यान पहिला वाघ आला तिथूनच दुसरा एक मोठा वाघ बाहेर येतो. दोन वाघ पाहताच ज्या गाडीतून हा व्हिडीओ काढण्यात आलाय त्या गाडीतील प्रवासी घाबरतात आणि गाडी मागे घ्या मागे असं चालकाला सांगू लागतात. मात्र चालक त्यांना शांत राहण्यास सांगतो. थोड्या वेळात हे वाघ पुन्हा जंगलामध्ये निघून जातात.

एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये टायगर सफारीसाठी जावं असा हा व्हिडीओ वाटतोय. व्हिडीओमध्ये गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात दोन्ही वाघ अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

महिंद्रांनी हा व्हिडीओ महाबळेश्वरचा असल्याचं म्हटलं असलं तरी हा व्हिडीओ फार जुना आहे. यापूर्वीही हा व्हिडीओ अनेकदा व्हायरल झालाय. २०१९ सालापासून हा व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून हे वाघ सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांमधील समृद्ध जैवविविधतेचे प्रतिक मानले जातात. जंगलात वाघ असणे हे समृद्ध जंगलाचं प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. महाबळेश्वर-पाचगणी पट्ट्यामध्ये अनेकदा वाघ दिसून येतात. मात्र महिंद्रांनी केलेल्या दाव्याप्रमाणे हा व्हायरल व्हिडीओ या भागातील नसून ताडोबातील आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी पट्ट्यापासून जवळच चांदोली राष्ट्रीय उद्यानही आहे. ३१७.६७० चौ.किमी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौ.किमी असे मिळून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यच्या सह्यद्रीच्या डोंगररांगांत कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. त्यामुळे जंगल पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण आहे. २०१० मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात महत्त्वपूर्ण पाणलोट क्षेत्र आहेत. अनेक झरे तसेच वारणा आणि कोयना नद्याही येथूनच उगम पावतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर निम सदाहरित वृक्षराजीने नटलेला आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो.