School Reunion Viral Video: जून महिना उजाडला की शाळेत जाण्याचे वेध लागतात. सुट्टी संपल्याचं दुःख मनात असलं तरी आपल्या वर्गातल्या मित्र मैत्रिणींना भेटण्याचा, पावसाळ्यात शाळेच्या मैदानात जाऊन खेळण्याचा, नव्या वर्गात जाऊन बसण्याचा उत्साह काही औरच असतो. अलीकडच्या बदललेल्या पिढीत शाळेविषयीची ओढ कमी होत गेली असली तरी नवा वर्ग, नवे शिक्षक, नवी मज्जा यांची किंमत जुन्या पिढीला चांगलीच लक्षात असेल. कदाचित आता हे वाचूनच तुमच्याही डोळ्यासमोरून सर्रकन आठवणींचा अल्बम गेला असेल ना? हीच मजा अनुभवण्यासाठी एका शाळेचे विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी आपल्या जुन्या वर्गात परतले होते. या वर्गमित्रांचा शाळेच्या जुन्या वर्गातील व्हिडीओ सध्या ऑनलाईन चर्चेत आला आहे. त्यांच्या माध्यमातून तुमच्याही शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खाली दिलेला हा व्हिडीओ आवश्य पाहा.
ज्ञानेश्वर विद्यालय, वरूड चक्रपान या पेजवर हा मूळ व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. कॅप्शनवरून लक्षात येते की व्हिडीओमध्ये दिसणारे विद्यार्थी १९९८ – ९९ च्या बॅचचे आहेत, म्हणजेच साधारण २५ वर्षांपूर्वी त्यांनी ही शाळा सोडली असणार. “अशी पाखरे पुन्हा येती आणि स्मृती उजळून जाती.” या प्रसिद्ध काव्यपंक्तींसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ सुरु होताना साधारण चाळिशीतील काही माणसं शाळेच्या पायऱ्यांवरून वर चढून आपल्या वर्गात येताना दिसतात. वर्गाच्या भिंतीवर ८ वी अ असे लिहिलेलं आहे. नंतर प्रत्येक जण आपल्या त्याच जुन्या बाकावर जाऊन बसतो. सर्वात खास व्यक्तीची एंट्री तर व्हिडिओच्या शेवटी होते, ही व्यक्ती आत येताच हे सगळे विद्यार्थी उभे राहतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा न बोलता व्यक्त झालेला आनंद या व्हिडीओची खरी शान ठरत आहे.
Video: अशी पाखरे पुन्हा येती..
हे ही वाचा<< Mumbai Local Mega Block: दिवा स्थानकात उशिरा लोकल आली खरी पण दारं बंदच! संतप्त प्रवाशांनी मग जे केलं.. पाहा Video
हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर अनेकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. शाळेच्या दिवसांची खूप आठवण येते. खूप छान उपक्रम केला दादा तुम्ही, नशीबवान आहात अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिलेय की, “शाळेत असताना कधी एकदा मोठे होतोय, कामाला लागतोय आणि गृहपाठापासून सुटका होतेय असं वाटायचं, आज ते सगळं घडताना शाळेच्या बाकावरच शांतता होती, आनंद होता याची जाणीव होतेय”. तब्बल १ लाख ८० हजार लाईक्स असलेल्या हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण आली का? हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.