आई होण्यासाठी वयाचे बंधन असते; पण मुले सांभाळण्यासाठी वयाचे बंधन नसते, असे आपण अनेकदा ऐकतो. पण, एका महिलेने आई होण्यासाठी असलेले वयाचे बंधनही आता मोडीत काढले आहे. युगांडामधून ही आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील सफीना नामुकवाया नावाच्या एका महिलेने चक्क वयाच्या ७० व्या वर्षी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे; ज्यामुळे ती आता आफ्रिकन देशांतील सर्वांत वयस्कर आई ठरली आहे. जन्माला आलेल्या बाळांमध्ये मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. या प्रसूतीनंतर दोन्ही बालके आणि आई, असे तिघेही सुखरूप आहेत.
युगांडाची राजधानी कंपालामधील एका रुग्णालयात सफीना नामुकवाया यांनी सिझेरियन ऑपरेशनद्वारे दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. या आश्चर्यकारक प्रसूतीच्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही अवाक झाले आहेत.
वूमेन्स हॉस्पिटल इंटरनॅशनल अॅण्ड फर्टिलिटी सेंटरचे (WHI&FC) संस्थापक डॉ. एडवर्ड तामाले साली यांनी या आश्चर्यकारक गर्भधारणा आणि प्रसूतीचे पर्यवेक्षण केले. त्यांनी म्हटले की, आई आणि नवजात बालके सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सध्या सर्वांची प्रकृती उत्तम आहे.
सफीना नामुकवाया या कंपालाच्या पश्चिमेकडील १२० किलोमीटर अंतरावरील मसाका या ग्रामीण भागात राहतात. त्यांनी गर्भधारणा आणि बालसंगोपनासाठी आव्हानात्मक मानल्या जाणार्या वयात IVF तंत्राच्या मदतीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. याआधी सन २०२० मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.