जर एखाद्या व्यक्तीच्या बॅंक खात्यामध्ये पैसे नसतील तर त्याला एटीएममधून पैसे काढता येऊ शकत नाहीत, किंव ट्रान्सफर करता येत नाहीत, हे आपणाला माहिती आहे. पण सध्या एका व्यक्तीच्या खात्यात पैसे नसतानाही त्याने एक दोन नव्हे तर तब्बल ९ कोटींहूनअधिक रक्कम काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर या व्यक्तीने एटीएममधील तांत्रिक बिघाडाचा पुरेपूर फायदा घेत एटीएममधून नऊ कोटींहून अधिक रक्कम काढल्याचं उघडकीस आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेतील या पैशांची खूप उधळपट्टी केली आणि नंतर स्वतःच मीडियासमोर येऊन सत्य सांगितले, ज्यामुळे त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील वंगारट्टा येथील आहे.
द सनच्या वृत्तानुसार, डैन सांडर्स नावाच्या व्यक्तीने नुकताच त्याच्याबरोबर घडलेला जुना किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितलं २०११ मध्ये तो मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला होता. नॅशनल ऑस्ट्रेलिया बँकेच्या एटीएममधून त्याने १० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने व्यवहार रद्द झाल्याचा त्याला मसेज आला. यावेळी डैनने त्याच्या क्रेडिट खात्यातील पैसे डेबिट खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही अयशस्वी झाला. तरीही त्याने यावेळी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता एटीएममधून काही रक्कम बाहेर आली. एटीएममध्ये ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्याचा मेसेज दिसत असतानाही पैसे बाहेर येत असल्याचे पाहून डैनला धक्का बसला. शिवाय त्याने आणखी दोन-तीन वेळा ट्रान्झॅक्शन केले, आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक वेळी एटीएममधून पैसे निघाले आणि तेही खात्यातील एकही रुपया कट न होता.
हेही पाहा- “आमचा घटस्फोट…” सीमा खोटं बोलतेय, गुलाम हैदरने मुलाखतीदरम्यान पत्नीवर केला गंभीर आरोप, म्हणाला…
खरं तर, एटीएममधील तांत्रिक बिघाडामुळे हा सर्व प्रकार घडला होता आणि याचा गैरफायदा घेत डैनने शेकडो वेळा एटीएममधून पैसे काढले. ५ महिन्यांत त्याने जवळपास ९ कोटींहून अधिक पैसे काढले. डैन रोज रात्री १२ ते २ च्या दरम्यान पैसे काढायचा. कारण, एटीएम या वेळेत बँक नेटवर्कपासून डिस्कनेक्ट व्हायचे, ज्यामुळे त्याला या वेळेत दोन खात्यांमध्ये हवे तेवढे पैसे ट्रान्सफर करण्याची संधी मिळायची. दरम्यान, डैनने बँकेत फोन करून आपल्या खात्यात काही समस्या आहे का, अशी विचारणा केली. मात्र बँकेनेच सर्व काही ठीक असल्याचे सांगितल्यावर डैनने बिनधास्तपणे पैसे काढणे सुरूच ठेवले.
एटीएममधून पैसे काढून डैनने खूप मौज मजा केली आणि मित्रांनाही त्याने पार्टी दिली. तो प्रायव्हेट जेटने प्रवास करायचा. पबमध्ये दारू प्यायचे आणि महागड्या रेस्टॉरंट्समध्ये जेवायला जायचा. मात्र, अखेर डैनने स्वत:च या प्रकरणाचा खुलासा केला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. २०१६ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर डैनने पुन्हा बारटेंडर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण या एटीएम बिघाडावर बँकेने कधीही भाष्य केले नाही. मात्र, तज्ज्ञांनी याला तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं.