चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यशस्वी ठरली हे माझे शब्द नव्हते. समितीने सुरुवातीला विश्लेषण करुन मोहिमेच्या यशाचे मूल्यमापन केले होते. त्या आधारावर हा आकडा देण्यात आला होता. या मोहिमेत जे महत्वाचे टप्पे गाठले त्या आधारावर ९८ टक्के यश मिळवल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.

चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणापासून ते विक्रमच्या चंद्रावरील लँडिंगपर्यंत वेगवेगळे टप्पे या मोहिमेमध्ये होते. जीएसएलव्ही एमके ३ रॉकेटद्वारे चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण, त्यानंतर कक्षा बदलाचे वेगवेगळे टप्पे, चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटरपासून विक्रम लँडरचे वेगळे होणे. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत विक्रमचे चंद्रावरील लँडिंग होईपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते.

मोहिमेतील वेगवेगळी उद्दिष्टये पूर्ण झाल्यानंतर समिती चांद्रयान-२ मोहिम ९८ टक्के यश मिळाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली होती असे सिवन यांनी सांगितले. सिवन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
चांद्रयान-२ मोहिेमेतून काय मिळवले? या प्रश्नावर सिवन यांनी प्रथमच चार टनापेक्षा जास्त वजनाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्याची जीएसएलव्ही रॉकेटची क्षमता सिद्ध झाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. लँडर आणि ऑर्बिटर हे दोन सॅटलाइट यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत परस्परापासून वेगळे झाले.

ऑर्बिटरमध्ये आम्ही सर्वात अत्याधुनिक पेलोड वापरले आहेत. जगात पहिल्यांदाच अशा उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. चंद्रापासून १०० किमी अंतरावर ही सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत. या पेलोडसमुळे नवीन सायन्सची सुरुवात होईल असा दावा सिवन यांनी केला. चंद्राच्या पृष्ठभागापासून अत्यंत जवळ असताना शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

नासाने जारी केलेले फोटो
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे उतरवण्यात आले त्या लँडींग साईटचे फोटो ट्विट केले आहेत. नासाने आपल्या ट्विटर हॅण्डवरुन लुनार रिकन्सेन्स ऑर्बिटरच्या (एलआरओ) माध्यमातून काढलेले फोटो ट्विट केले असून या हाय रेझोल्यूशन इमेजेस आहेत. असं असलं तरी विक्रम लँडरचा अचूक ठावठिकाणा सांगता येणार नाही असं नासाने म्हटलं आहे.