‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीला साजेसं एक उदाहरण समोर आलं आहे. ते म्हणजे अमेरिकेतील एक १३ वर्षाचा मुलगा १०० फूट खोल दरीत पडूनही सुखरुप बचावला आहे. तो एरिजोना राज्यातील ग्रँड कॅनियन व्हॅलीत १०० फूटावरुन खाली पडल्याची माहिती बीबीसीने दिली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, दरीत पडलेला मुलगा त्याच्या कुटुंबीयांसह लोकप्रिय पर्यटन स्थळ नॉर्थ रिम येथे गेला होता. या ठिकाणी फिरत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला. हा मुलगा दरीत पडल्यानंतर पर्यटनस्थळी एकच गोंधळ उडाला होता. शिवाय मुलगा खोल दरीत पडल्यामुळे उपस्थित लोकांना त्याच्या जीवाचं काही बरं वाईट तर होणार नाही ना? अशी भीती सतावत होती.
दरीत पडल्यानंतर आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी दोन तास शोध घेतल्यानंतर उंचावरुन पडलेल्या मुलगा सुखरुप सापडला. मुलाला जिवंत पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले तर अनेकांना खूप आनंदही झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातातून वाचलेल्या मुलाचे नाव वायट कॉफमन असे असून तो अपघातादरम्यान गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, डॉक्टरांनी आता त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं आहे. तर रिपोर्टनुसार, लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्जदेखील मिळणार आहे.
हेही पाहा- ब्रेडसारखे शूजही खाता येणार? आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या अनोख्या शूजचे फोटो व्हायरल
मुलाने सांगितला थरारक प्रसंग –
स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टनुसार, अपघातानंतर मुलाला धक्का बसला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने सांगितले की, तो एका हाताने खडकाला पकडून खाली बसला होता, तेव्हा त्याचा हात सुटला आणि तो दरीत पडला. पडल्यानंतर काय घडलं याबाबत त्याला काहीच आठवत नाहीये. तो पुढे म्हणाला, “मला थोड थोड आठवते आहे, ज्यामध्ये मला रूग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. त्यानंतर माझ्याबरोबर नेमके काय झाले हे मला आठवत नाही.” उंच टेकडीवरून पडल्यामुळे वायटला अनेक ठिकाणी फ्रॅक्चरही झालं आहे.