Flood Rescue Stories : सोशल मीडियावर सध्या एक हृदयाला भिडणारा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फक्त माणसांमधीलच नाही, तर प्राण्यांमधील संवेदनशीलता आणि दया किती असते, याचे जिवंत उदाहरणं आहे.या व्हिडिओतून सर्वात मोठा धडा हा मिळतो की दया, करुणा आणि मदत करण्याची भावना ही फक्त माणसांतच नाही, तर प्राण्यांतही प्रामाणिकपणे दिसते. गजराजाने स्वत:चा जीव धोक्यात घालून एका छोट्या हरणाला वाचवलं आहे.

मुसळधार पावसात जेव्हा पुराचं पाणी वेगाने वाढत होतं, तेव्हा एक निरागस हरीण त्यात अडकतं. पाण्याचा जोर इतका असतो की ते कधीही वाहून जाईल अशी भीती जाणवते. पाण्याच्या रौद्र प्रवाहासमोर ते पूर्णपणे असहाय दिसत होतं आणि क्षणोक्षणी त्याचा जीव धोक्यात असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. अचानकच तिथे एक विशाल पण अत्यंत शांत स्वभावाचा हत्ती दिसतो.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओत स्पष्ट दिसतं की हात्ती परिस्थिती नीट ओळखून खूप सावधपणे हरणाकडे जातो. पाण्याचा जोरदार प्रवाह असूनही हत्तीची अजिबात घाबरत नाही. तो आपल्या मजबूत सोंडेने त्या छोट्या हरणाला पकडतो आणि त्याला पाण्यातून उचलून सुरक्षित ठिकाणी पोहोचवतो.

हत्तीचं हे वर्तन हे सिद्ध करतं की प्राणी फक्त स्वतःच्या प्रजातीतील जीवांबद्दलच नाही, तर इतर प्राण्यांबद्दलही तेवढीच माया, करुणा आणि संवेदना ठेवू शकतात. अनेकदा त्यांची दया माणसांपेक्षाही अधिक शुद्ध असल्याचे जाणवते. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स म्हणत आहेत— “प्राण्यांमधील दयाभाव अजूनही जिवंत आहे.”

या व्हिडिओचं नेमकं लोकेशन किंवा मूळ स्रोत अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही तो कुठलाही असो, त्याचा संदेश जगभरासाठी सारखाच महत्त्वाचा आहे. हे छोटंसं दृश्य आपणास आठवण करून देतं की निसर्गातसुद्धा प्रेम, दया आणि सहानुभूती अफाट आहे. सर्वात मोठा जीवही सर्वात छोट्या प्राण्याच्या रक्षणासाठी पुढे येऊ शकतो.

आजच्या काळात, जिथे हिंसा, संघर्ष आणि तणावाच्या बातम्या सतत कानावर पडतात, अशा वेळी हा व्हिडिओ आशेचा किरण ठरतो. तो दाखवतो की दयेची भावना अजूनही संपलेली नाही — ना माणसांत, ना प्राण्यांत. अनेकदा सर्वात मोठं हृदय हे अगदी शांत आणि निरागस प्राण्यात दडलेलं असतं… आणि हा हत्ती त्याचं अनोखं उदाहरण आहे.