सध्या सोशल मीडियावर उत्तराखंडमधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केदारनाथ धामच्या यात्रेदरम्यान दोन तरुण एका घोड्याला जबरदस्ती नशा करायला लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील दोन तरुण घोड्याचे तोंड घट्ट पकडून त्याला जबरदस्ती सिगारेट ओढायला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या वेळी घोडा अस्वस्थ झाल्याचं दिसत असतानाही ते घोड्याला मोकळा श्वास घेऊ देत नाहीत.
हा व्हिडीओ केदारनाथ धामच्या दर्शनादरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच ही घटना चिंताजनक आहे, कारण हजारो लोक केदारनाथला जाण्यासाठी घोडे बुक करतात. मात्र, घोड्याचे मालक त्यांना नशेचे पदार्थ खायला देतात, त्यामुळे जर भाविक अशा घोड्यांवर बसून केदारनाथला जात असतील तर त्यांच्यासोबत गंभीर अपघातही होऊ शकतो, असंही नेटकरी म्हणत आहेत.
हेही पाहा- भरधाव बससमोर अचानक महिला आली अन्…, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनचे CCTV फुटेज Viral
याआधीही अशा घटना घडल्या आहेत –
अशा विचित्र पदार्थांच्या सेवनामुळे घोड्यांचे आरोग्यही बिघडू शकते. गेल्या काही दिवसांत असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये केदारनाथ येथे प्राण्यांवर अत्याचार केल्याचं पाहायला मिळतात. केदारनाथ मंदिराच्या मार्गावर अनेक मालक घोड्यांसोबत गैरवर्तन करताना दिसतात. त्यांना मारहाण करतात आणि त्यामुळेच येथील अनेक घोड्यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
पोलिसांनी घेतली दखल –
उत्तराखंड पोलिसांनी घोड्याला जबरदस्तीने सिगारेट ओढायला लावल्याच्या प्रकरणाची दखल घेतली आहे. व्हिडीओला रिप्लाय देताना पोलिसांनी ट्वीट केले की, आम्ही व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे, ज्यामध्ये एका घोड्याला जबरदस्तीने नशा करायला लावलं जात आहे. आम्ही व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. दरम्यान, पोलिसांनी यात्रेकरूंना, अशा घटनांवर तात्काळ कारवाईसाठी, जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहनदेखील केलं आहे.