डोसा हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांच्या आवडीचा आहे. तुम्ही रस्त्यावरील स्टॉलवर अनेकदा डोसा खाल्ला असणार. रवा डोसा, म्हैसूर डोसा, मसाला डोसा, साधा डोसा, नाचणीचा डोसा, शेजवान डोसा आदी विविध डोसे तुम्ही आवडीने खात असाल. आज सोशल मीडियावर डोशासंबंधीचाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका रेस्टॉरंटमध्ये विचित्र पद्धतीने डोसा बनवला जात आहे; ती कृती पाहून तुम्ही डोसा खाण्याआधी १० वेळा विचार कराल.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रेस्टॉरंटच्या स्वयंपाकगृहात ग्राहकांची गर्दी आहे. हॉटेलमध्ये सर्व ग्राहक त्यांच्या ऑर्डर येण्याची उत्सुकतेने वाट बघत आहेत. तर सगळ्यांना लवकरात लवकर ऑर्डर मिळावी यासाठी एक व्यक्ती स्वयंपाकगृहात एक मोठा तवा घेते आणि तो पाण्याने धुऊन घेत आहे. तसेच विचित्र गोष्ट अशी की, हा तवा पाण्याने धुऊन घेतल्यावर ती व्यक्ती खराटा मारून, तवा स्वछ करून घेते आणि मग त्याच तव्यावर डोसा बनवण्यास सुरुवात करते.
हेही वाचा…महाकाय समुद्र, उसळलेल्या लाटा आणि मासेमारी; थरारक VIDEO पाहून येईल अंगावर काटा
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा : https://www.facebook.com/watch/?v=3636023723386138
तव्यावर मारला झाडू अन् बनवला डोसा :
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बंगळुरूचा आहे. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांसाठी डोसा बनवण्यासाठी एक व्यक्ती तवा धुऊन घेते. त्यानंतर ती व्यक्ती त्यावर पाणी टाकून खराटा मारून, तवा स्वच्छ करून घेते. त्यानंतर डोशाचे पीठ तव्यावर टाकून घेते आणि त्यावर तुपाचे पाकीट फोडून, त्यातील तूप तव्यावरील १२ डोशांवर ओतून घेते. नंतर प्रत्येक डोशाच्या मधोमध व्यक्ती भाजी ठेवते आहे आणि वरून मसाला टाकून घेते आहे. त्यानंतर तयार झालेला डोसा दुमडून, तो केळीच्या पानात ठेवून, त्याबरोबर चटणी व सांबार वाटीतून देऊन, अशा रीतीने डोसा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Thefoodiebae या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. रिषभ शर्मा, असे या व्हिडीओ श़ेअर करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो सोशल मीडियाचा फूड ब्लॉगर आहे. बंगळुरूच्या रेस्टॉरंटमधील ही डोसा बनवण्याची पद्धत खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डोशासाठी एवढ्या प्रमाणात वापरलेलं तूप आणि तवा स्वछ करण्यासाठी खराटा वापरलेला पाहून नेटकरी कमेंट्समध्ये संताप व्यक्त करताना दिसून आले आहेत.